सोलापूर : पावसावर सुरुवातीला मान्सूनच्या शेतक-यांमध्ये उमटलेली आशेची पालवी आता पावसाच्या दीर्घ खंडामुळे सुकण्याच्या मार्गावर आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार विश्वास ठेवत शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात खरीप पेरण्या केल्या. मात्र, त्यानंतर एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांची वाढ थांबली असून शेतक-यांच्या डोळ्यात चिंता आणि निराशेचे भाव आहेत.
मे अखेरीस झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे आशावादी झालेल्या शेतक-यांचे स्वप्न आता मोडकळीस आले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पावसानंतर जिल्हाभरात खरीप पेरण्या पूर्ण झाल्या. मात्र, गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत.
शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, बाजरी, मका, उडीद, मूग आदी पिकांची पेरणी केली. पेरणीनंतर सुरुवातीच्या ओलाव्यामुळे पीक उगवण चांगली झाली. परंतु त्यानंतर पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. सततचे उन्ह आणि जोरदार वा-यांमुळे जमिनीतील ओल निघून गेल्याने अनेक ठिकाणी पिके जमिनीला लोळू लागली आहेत.दरम्यान, दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी सायंकाळपर्यंत आकाश पुन्हा निरभ्र होते. उन्हाळ्यात जसे चांदणे पडतात, तशीच स्थिती सध्या जुलैमध्ये अनुभवास येत आहे, हे चित्र शेतक-यांची चिंता वाढवणारे आहे. जर दोन-चार दिवसांत जोरदार व समाधानकारक पाऊस झाला नाही, तर हजारो हेक्टरवरील खरीप पिके करपून जाण्याची शक्यता आहे.
परिणामी शेतक-यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असून या संकटातून सावरणे शेतक-यांसाठी अत्यंत कठीण ठरणार आहे, शेतीसाठी मोठी आर्थिक गुंतवणूक केलेल्या शेतक-यांच्या चेह-यावर सध्या काळजीचे सावट आहे. प्रशासनाने पावसाअभावी नुकसान झाल्यास मदतीचा विचार करावा, अशी मागणीही शेतकरी संघटनांकडून होऊ लागली आहे.
सध्याच्या हवामान प्रणालीचा विचार करता, संपूर्ण जुलै महिना कोरडाच जाण्याची शक्यता आहे अशी भीती शेतकन्यांमध्ये निर्माण झाली आहे. भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळावरदेखील या महिनाअखेरपर्यंत समाधानकारक पावसाचे संकेत दिसत नाहीत. भारतीय हवामान खात्याचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी १६ व १७ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, हा पाऊस स्थानिक वातावरण निर्मितीवर अवलंबून असून व्यापक स्वरूपात पडेलच, याची खात्री देता येत नाही.

