कोल्हापूर : जिल्ह्यातील हुपरी येथे एकुलत्या एक मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याची उघडकीस आले आहे. हुपरी शहरातील महावीर नगर परिसरात पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. घराच्या वाटणीच्या वादातून हा भयंकर प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजयमाला नारायण भोसले(७०) आणि नारायण गणपतराव भोसले (७८, रा. महावीर नगर, अल्फालाइन गल्ली, हुपरी) या दाम्पत्याचा जन्मदात्या मुलाने अत्यंत थंड डोक्याने व अत्यंत निर्घृणपणे खून केला आहे. या दुहेरी हत्ये प्रकरणी त्यांचा मुलगा आरोपी सुनील नारायण भोसले (४८) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेसंदर्भात हुपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील भोसले गेल्या काही महिन्यांपासून घरवाटणीच्या मागणीवरून आई-वडिलांशी सतत वाद घालत होता. तसेच घराच्या वाटणीला आई-वडिलांनी विरोध केला होता. आई वडिलांनी घराची वाटणी नाकारल्याने वैतागलेल्या सुनीलने शुक्रवारी पहाटे साधारण साडेपाचच्या सुमारास आपल्या आई वडिलांची हत्या केली.
आईच्या हाताची नस कापली
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की, पहाटेच्या सुमारास सुनीलने झोपलेल्या वडिलांच्या डोक्यावर आधी काठीने वार केला त्यानंतर दगडाने जोरदार प्रहार केला. त्यानंतर खिडकीची काच फोडून त्यांच्या हाताची नस कापली. या हल्ल्यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला. तेवढ्यात घरात प्रवेश करत असलेल्या आई विजयमाला यांच्या डोक्यातही काचेच्या तुकड्याने घाव घातला तसेच आईच्याही हाताची नस कापली. त्यामुळे त्यांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सुनील थंड डोक्याने घराच्या बाहेर आला आणि त्यानंतर त्याने हुपरी पोलिस ठाणे गाठले. इथे त्याने पोलिसांसमोर आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
सुनील भोसलेची सखोल चौकशी सुरू
पोलिस निरीक्षक एन.आर. चौखंड, सहाय्यक निरीक्षक विक्रम शिंदे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक विभागाच्या तज्ञांनी घटनास्थळी पोहोचून ठसे, शस्त्र, रक्ताचे नमुने आणि काचेचे तुकडे व इतर पुरावे संकलित केले. दोघांच्याही मृतदेहांना शवविच्छेदनासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच सुनील भोसलेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून त्याने हत्या नेमकी कशी केली तसेच त्यामागे कोणते कौटुंबिक व सामाजिक कारण होते का, याचा तपास पोलिस करत आहेत.

