मुंबई : प्रतिनिधी
कुंडमळा दुर्घटनेबददल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग ? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
एक्स अकाउंटवर त्यांनी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभे आहे.
पावसाळ्याआधी तपासणी का नाही?
पण मुळात हा प्रसंग का येतो? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरते बोलायचे झाले तर पावसाळयाच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही? बरे प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचे नियोजन करून प्रशासनाकडून कामे करून का घेता येत नाहीत? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
लोकांनी उत्साहाला आवर घालायला हवा
पण लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडे भान ठेवायला हवे. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असे नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क राहायला हवे. आता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या ब-याच शहरांत पाणी साठणं, रस्त्यांची चाळण होणं, पूल पाडणं अशा घटना सुरु झाल्यात. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावं अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.