27.7 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीयभूस्खलनामुळे वायनाड हादरले, ४९ जणांचा मृत्यू

भूस्खलनामुळे वायनाड हादरले, ४९ जणांचा मृत्यू

ढिगा-याखाली अनेक कुटुंबे अडकल्याची भीती

वायनाड : केरळच्या वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आज पहाटे भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या. या भूस्खलनाच्या ढिगा-याखाली दबल्यामुळे ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तहानी होण्याची शक्यता आहे. वायनाडच्या मेप्पडी, मुबादक्काई आणि चुरल माला टेकड्यांवर भूस्खलन झाले आहे.

अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे एक वाजण्याच्या सुमारास मुबाडक्काई येथे पहिले भूस्खलन झाले. तर चुरल माला येथे पहाटे ४ वाजता पुढील भूस्खलन झाल्याचे अधिका-यांनी सांगितले. त्यावेळी बचावकार्य सुरू होते. चुरल माला शहरात पूल कोसळल्याने ४०० हून अधिक कुटुंबे अडकली आहेत. तर अनेक लोक जखमी झाले असून, अनेक घरे वाहून गेली आहेत. या संपूर्ण परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे केरळ सरकारने अद्यापही नुकसानीचे पंचनामे केलेले नाहीत.

मुख्यमंत्री पी. विजयन म्हणाले की, बचाव कार्यात सर्व सरकारी यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. या भागातील परिस्थिती बिकट असून, मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अनेक मंत्री वायनाडला पोहोचले असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कन्नूर डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सच्या दोन टीम लवकरच बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राहुल गांधींनी दु:ख व्यक्त केले

दरम्यान, वायनाडचे खासदार राहिलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून वायनाडमधील दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. भूस्खलनामुळे मी व्यथित झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल मी माझे दु:ख व्यक्त करतो. मला आशा आहे की जे अजूनही अडकले आहेत त्यांना लवकरच बाहेर काढले जाईल, असे राहुल गांधींनी म्हटले असून, राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि वायनाडचे जिल्हा दंडाधिकारी यांच्याशीही चर्चा करून नियंत्रण कक्ष स्थापन करण्याची विनंती केली असून, मदतकार्यासाठी काही गरज भासल्यास आम्हाला कळवा. यासोबतच राहुल यांनी यूडीएफच्या कार्यकर्त्यांना बचाव कार्यात मदत करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR