लातूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य सहकारी संस्थांपैकी एक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दि. १२ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत एकूण १३९ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. प्राप्त अर्जांची छाननी १९ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरापर्यंत करण्यात आली, ज्यामध्ये विविध उमेदवारांच्या ४८ अर्जांवर आक्षेप नोंदवले गेले होते.
निवडणूक कार्यक्रमानुसार २१ ऑक्टोबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी पात्र उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली. मार्केटींग सोसायटी, कृषी औद्योगिक सहकारी संघ, प्रक्रिया सहकारी संस्था, सूतगिरणी, साखर कारखाने व बीज प्रक्रिया सहकारी संस्था मतदारसंघातून बँकेचे विद्यमान चेअरमन धीरज विलासराव देशमुख आणि सचिन सुभाष पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान सचिन सुभाष पाटील यांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरल्याने या मतदारसंघातून धीरज देशमुख यांचा एकमेव वैध अर्ज शिल्लक राहिला. त्यामुळे या मतदारसंघातून धीरज विलासराव देशमुख यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.
















