लातूर : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत लातूर जिल्हा परिषदेने आपला ठसा उमटविला असून राज्य शासनाने निश्चित केलेल्या दहा मुख्य कार्यक्षमता निर्देशांकांच्या आधारे करण्यात आलेल्या मूल्यांकनात लातूर जिल्हा परिषदेने राज्यात तिसरा, तर मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पोषण ट्रॅकर अॅप्लिकेशनमधील माहितीच्या आधारे रँकिंग करण्यात आले. त्यात पूरक पोषण आहार वितरण, बालकांचे अचूक वजन मापन, कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, अंगणवाडी सेविकांच्या गृहभेटी, गर्भवती व स्तनदा मातांचे लसीकरण व समुपदेशनाची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये लातूर जिल्हा परिषदेने राज्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे.
जिल्ह्याची कामगिरी (टक्केवारी)…
पूरक पोषण आहार वितरण : ८५.७६
मोजमाप कार्यक्षमता : ९९
गृहभेट : ९९
गंभीर तीव्र कुपोषण : ०.२१
मध्यम कुपोषण : १.६२
वजन कमी असलेली बालके : ६.८९
खुंटलेली वाढ : १८.८४
जादा वजन : ३.५२
२४ मार्च रोजी मुंबईत होणार गौरव
जिल्हा परिषदेचे सीईओ राहुलकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात आले. जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविकांनी ‘पोषण ट्रॅकर’वर माहिती भरण्यापासून ते प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचविण्यापर्यंत चोख कामगिरी बजावली. या उपक्रमात राज्यात वाशिमने प्रथम, भंडारा जिल्ह्याने द्वितीय तर लातूरने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
लवकरच जिल्हा कुपोषणमुक्त : सीईओ मीना
आगामी काळात आणखीन विशेष उपक्रमांतून कुपोषण निर्मूलन, बालकांचा सर्वांगिण विकास आणि सेवा वितरण अधिक बळकट करण्यावर भर राहणार आहे. भविष्यात जिल्हा कुपोषणमुक्त होईल असा विश्वास सीईओ राहुलकुमार मीना यांनी व्यक्त केला आहे.
कामाची गती वाढविणार
सीईओ राहुलकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी ताईंनी केलेल्या सामूहिक प्रयत्नामुळे हे यश मिळाले आहे. समन्वयाने आणखीन गती वाढविण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख यांनी दिली.

