लातूर : प्रतिनिधी
एकच मिशन, जुनी पेन्शन या मागणीसाठी लातूर जिल्हा परिषद व संलग्न पंचायत समितीचे अधिकारी व कार्मचारी गेल्या ३ दिवसांपासून संपात सहभागी झाले आहेत. जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील १३ हजार ६४६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळा स्तरावर कार्यरत आहेत तर २ हजार ४५१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रत्यक्ष संपात सहभागी झाली आहेत.
२००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रलंबित प्रश्नांसाठी १४ मार्चपासून विविध संघटनांनी संपाची हाक दिली आहे. या संपात लातूर जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, शिक्षक संघटना, शासकीय व निमशासकीय संघटना सहभागी झाल्या आहेत. लातूर जिल्हा परिषदेच्या १ हजार २७६ शाळा आहेत. या शाळेतील ५ हजार ३१६ शिक्षकांपैकी १७२ शिक्षक सध्या रजेवर आहेत तर ८४७ शिक्षक प्रत्यक्ष संपात सहभागी झाले आहेत तर ४ हजार २९७ शिक्षक शाळेवर कार्यरत आहेत तसेच १४१ शिक्षकेतर कर्मचा-यांपैकी १ कर्मचारी रजेवर आहे.
२४ कर्मचारी संपात सहभागी असून ११६ कर्मचारी सेवेत कार्यरत आहेत तसेच खाजगी शाळेतील ९ हजार १५ शिक्षकांपैकी ११५ शिक्षक पूर्व परवानगीने रजेवर गेले आहेत तर १ हजार ३९२ शिक्षक संपात सहभागी झाले आहेत तर ७ हजार ९८१ शिक्षक शाळेत कार्यरत आहेत. १ हजार ३९८ शिक्षकेतर कर्मचा-यांपैकी २८ कर्मचारी रजेवर तर १८८ कर्मचारी संपावर गेले आहेत तर १ हजार २५२ कर्मचारी शाळेत सेवेत कार्यरत आहेत. जिल्ह्यातील एकही शाळा संपामुळे बंद नसल्याची माहिती लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी दिली.