24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूरआषाढी एकादशीला ५०० वारकरी भक्तांना मोफत पंढरपूर वारी

आषाढी एकादशीला ५०० वारकरी भक्तांना मोफत पंढरपूर वारी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
माझं लातूर परिवार आणि लातूर शहरातील ट्रॅव्हल्स व्यावसायिक यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातील ५०० वारकरी भाविक भक्तांना मोफत पंढरपूर वारीचे दर्शन घडवून आणण्याचे प्रयोजन करण्यात आले असून यासाठी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी १० ट्रॅव्हल्स उपलब्ध करुन दिल्या आहेत. कोरोना निर्बंधांमुळे गेल्या २ वर्षात वारक-यांना पंढरपूरला दर्शन घेणे शक्य झाले नाही मात्र यंदा ही संधी उपलब्ध झाली असून वारक-यांची गैरसोय टाळण्यासाठी ५०० वारक-यांना मोफत पंढरपूर वारीची संधी माझं लातूर आणि ट्रॅव्हल्स व्यावसायिक यांनी उपलब्ध करुन दिली आहे.

यासाठी १० ट्रॅव्हल्स वाहनांची सोय करण्यात आली आहे. इच्छुक भाविक वारक-यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले असून यासाठी ३० जून २०२२ पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी शहरातील रुद्राक्ष ट्रॅव्हल्स, राधिका ट्रॅव्हल्स यशवंतराव चव्हाण संकुल, नर्मदा ट्रॅव्हल्स गांधी चौक, चौधरी ट्रॅव्हल्स मालपाणी कॉम्प्लेक्स, शुभम कलेक्शन हनुमान चौक, दीपिका लेडीज एम्पोरियम-कापड लाईन, लातूर याठिकाणी आधारकार्डसहित नोंद करून आपला पास घेऊन जाणे आवश्यक आहे.

आषाढी एकादशी १० जुलै रोजी सकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण संकुल, अशोक हॉटेल येथून हे सर्व वारकरी पंढरपूरकडे रवाना होतील. यादरम्यान सर्व भाविक वारक-यांना चहापाणी आणि फराळाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. त्याच दिवशी सहभागी प्रवाशी भाविकांना सायंकाळपर्यंत परत लातूरला आणले जाईल. राज्याच्या धार्मिक दृष्टिकोनातून आषाढी एकादशीला खूप महत्व असून राज्याच्या या सर्वात मोठया उत्सवात सहभागी होण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली आहे. जास्तीतजास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माझं लातूर परिवार आणि ट्रॅव्हल्स व्यावसायिक यांच्या वतीने करण्यात आले आहे. मोफत पंढरपूर वारी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ मेदगे, जुगलकिशोर तोष्णीवाल, जगदीश स्वामी, शफीक चौधरी, वाजीद शेख, योगेश श्.िांदे यांच्यासह माझं लातूर परिवारातील सदस्य परिश्रम घेत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या