लातूर : गंजगोलाई येथून १२ नंबर पाटीकडे प्रवाशी खचाखच भरून घेऊन जाणा-या एलएमटीने कोरोना प्रतिबंधक नियमांचा फज्जा उडवला. या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लातूर महानगरपालिकेच्या अंतर्गत एमएमटी बसेस चालवल्या जातात. लातूर शहरात वाढता कोरोना पाहता लातूर महानगर पालिकेचे प्रशासन सतत कोरोनाच्या नियमांचे पालन करा, असे जनतेला सांगत असताना एलएमटीनेच कोरोना नियमांचे उल्लंघन केले आहे. गंजगोलाईतून १२ नंबरकडे जाणारी एमएच २४ एयू ४७९२ या एलएमटी सिटीबसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहतूक होत असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना निदर्शनास आले. त्यांनी गांधी चौक येथून सायंकाळी ६.३० वाजता सिटी बस ताब्यात घेवून गांधी चौक पोलिस ठाण्यात लावली. या सिटीबस चालकाच्या विरोधात कोरोना नियमांचे उल्लंघन करणे, जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीचे आदेश डावलणे, सोशल डिस्टसिंग न पाळणे, तोंडाला मास्क न लावता साथ रोग पसरवण्याची धोकादायक कृती केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.