लातूर : प्रतिनिधी
किराणा दुकानातून वाईन विक्रीसह आमदारांना मोफत घरे देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. राज्य सरकारने किराणा दुकानातून वाईनची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील आमदारांना मुंबईत घरे देण्याच्या निर्णयावरही चर्चा सुरू आहे. या निर्णयांना या आंदोलनाद्वारे विरोध दर्शविण्यात आला.
माहिती अधिकार कायद्यातील कलम ४ मधील १७ कामांच्या माहितीचे फलक प्रत्येक शासकीय कार्यालयात लावणे बंधनकारक आहे.असे असतानाही कुठल्याच कार्यालयात असे फलक दिसून येत नाहीत.ते लावण्यासंदर्भात न्यासच्या वतीने निवेदने देण्यात आली होती. त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. राज्य शासनाने वाईन विक्रीसह घरे देण्याचा निर्णय रद्द करावा तसेच माहिती अधिकार कायद्यानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात १७ कामांच्या माहितीचे फलक लावण्यात यावेत, अशी मागणी जिल्हाधिर्कायांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष हनीफभाई शेख,जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस बासिदखां पठाण,निलंगा तालुकाध्यक्ष सुधीर पुरी यांच्या स्वार्क्षया आहेत.या आंदोलनात श्रीनिवास चव्हाण,वीर सकट, अक्षय गायकवाड, अहमदभाई हरणमारे, हेमंत कुलकर्णी, एजाज शेख, कानिफनाथ गंगणे, अस्लम शेख, श्रीराम मगर, अनिकेत गव्हाणे, ईश्वर गव्हाणे, मुकेश गोरे, सुजित मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.