लातूर : प्रतिनिधी
विविध क्षेत्रांमध्ये लातूरने मिळवलेले यश आपणास सर्वांना ज्ञात आहे. शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही भरीव, असे कार्य करण्यासाठी राज्य व देशपातळीवरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन या पुढील काळात आम्ही करु. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वी करावी, असे मत ७९ व्या महाराष्ट्र राज्य युथ मुले बॉक्सिंग स्पर्धा २०२२ उद्घाटन प्रसंगी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केले.
सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, लातूर, शहर बॉक्सिंग असोसिएशन व द्रोणाचार्य स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा संकुल येथे आमदार धीरज देशमुख यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, या पुढील काळात संपन्न होणा-या स्पर्धेसाठी रोख पारितोषिकांची रक्कम मांजरा परिवाराकडून भरघोस मदत दिली जाईल, असे आश्वासनही यावेळी दिले. प्रारंभी क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रदीप देशमुख यांनी प्रास्ताविक पर विचार मांडले. यावेळी बॉक्सिंग क्षेत्रातील भारतीय पातळीवरील सर्वश्रेष्ठ खेळाडू कॅप्टन शाहूराज बिराजदार यांनी केलेल्या भूषणावह गौरवशाली कार्य व सेवा या संदर्भातील सविस्तर माहिती सांगून त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणा खेळाडूसाठी मार्गदर्शक आहेत याची जाणीव यावेळी करुन दिली.
या स्पर्धेसाठी राज्यभरातून १६० खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा १८ ते २१ एप्रिलदरम्यान लातूर क्रीडा संकुल येथे होणार आहे. यावेळी विचार मंचावर लातूर ग्रामीणचे माजी आमदार त्र्यंबक भिसे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, प्रवीण पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, कॅप्टन शाहूराज बिराजदार, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष भरतकुमार वाव्हळ, कोषाध्यक्ष एकनाथ चव्हाण, लालासाहेब चव्हाण, संभाजी रेड्डी, हनुमंत
माटेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय पाटील, डॉ. प्रदीप देशमुख आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शंकरानंद येडले व डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी केले. शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय पाटील यांनी आभार मानले.