लातूर : औसा-रेणापूर येथील उपविभागीय अधिका-यांच्या दि. १५ डिसेंबर २०२२ च्या पत्रावरुन तहसीलदारांनी गोंद्री येथून वेठबिगारांची मुक्तता केली आहे. या प्रकरणी संबधितांवर बंध बिगार पध्दती (उच्चाटन) अधिनियम १९७६ च्या कलम २०, २१, २२ व २३ प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वेठबिगार मुक्तीमोर्चा व भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्यावतीने जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सुटका करण्यात आलेले विठबिगार मजूर हे मध्यप्रदेशातील मनिहार (मांगोर) ता. घाटी गाव जिल्हा ग्वाल्हेर येथील आहेत. ते एका कारखान्यात वेठबिगार पध्दतीने काम करीत असताना आढळून आले. या मजुरांना १००० रुपये अॅडव्हान्स देऊन ५०० ते ६०० रुपये मजुरीने तोंडी करार करुन महाराष्ट्रात आणले होते. काही मजूर परत जाण्याची मागणी करीत होते परंतु त्यांना जाऊ दिले जात नव्हते. सदरील मजुरांना औसा येथे आणल्यानंतर कामगार उपायुकतांनी चौकशी करुन त्यांच्याकडून जवाब नोंदवून घेतला. यात कामगार उपायुक्तांनी दाखविलेल्या दिरंगाईबद्दल त्यांच्यावर व संबधित अस्थापनेवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मोर्चाचे अध्यक्ष सुभाष निंबाळकर, संघटनेचे नेते प्रा. सुधीर अनवले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.