चाकूर : प्रतिनीधी
येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून या निवडणुकाच्या प्रचाराला शेवटच्या टप्प्यात वेग आला असून मतदारांसोबत बैठका तसेच जाहीर सभेच्या माध्यमातून सुसंवाद साधला जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.आता शेवटच्या टप्यात बाजार समितीची निवडणूक अटीतटीची होत असून दुरंगी लढतीत महविकास आघाडी आणि भाजपा प्रणित शेतकरी विकास पॅनलमध्ये चुरशीची लढत होत आहे.
१८ जागेसाठी ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीने मतदारांशी संवाद जाहीर सभेद्वारे साधत मतदारांना विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.आमदार बाबासाहेब पाटील यांनी कृषि उत्पन्न बाजार समीती ताब्यात द्या, विकासाच्या माध्यमातुन बाजार समितीचा चेहरा मोहरा बदलू, असे आश्वासन दिले. तर शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारासाठी भाजपचे माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील ,माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके पाटील यांनी प्रचार दौरे करून गावोगावी जाऊन मतदारांशी संवाद साधला आहे. महविकास आघाडी तसेच भाजपनेही सभापती पदासाठी नवीन चेहरा असलेले उमेदवार जाहीर केले आहेत .त्यामुळे निवडणुकीत रंगत भरली आहे.