20.7 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeलातूरजय जवान, डॉ. निलंगेकर कारखाने ट्वेंटीवन शुगरकडे भाडेतत्त्वावर

जय जवान, डॉ. निलंगेकर कारखाने ट्वेंटीवन शुगरकडे भाडेतत्त्वावर

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यात सध्या बंद असलेले निलंगा तालुक्यातील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि चाकूर तालुक्यातील जय जवान जय किसान शेतकरी सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र राज्य शिखर बँकेने ट्वेंटीवन शुगरला दीर्घ मुदतीसाठी भाडेतत्वावर चालवण्यासाठी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील जय जवान जय किसान हे साखर कारखाने मागच्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत आहेत. थकित कर्ज वसुली व्हावी आणि कारखानेही चालू व्हावेत, म्हणून महाराष्ट्र राज्य शिखर बँकेने हे कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेऊन अनेक वेळा त्यासाठी निविदा काढली होती, परंतु त्यासाठी फारसे कोणी पुढे आले नव्हते. दरम्यान, हे कारखाने मांजरा परिवाराने चालवावेत, म्हणून ऊस उत्पादक शेतक-यांच्या शिष्टमंडळाकडून विनंती होत होती.

यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. शिवाय एकरी ऊस उत्पादनही वाढले आहे. त्यामुळे ऊस तोडणी कार्यक्रम खूपच पुढे गेला आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टीतून उभारणी झालेल्या आणि सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, पालकमंत्री अमित विलासराव देशमुख तसेच आमदार धिरज देशमुख यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मांजरा परिवारातील सर्वच साखर कारखाने दीड ते दुप्पट कार्यक्षमतेने सुरू आहेत. चालू गळीत हंगामात या परिवारातील ८ साखर कारखान्यांनी आजवर ४३ लाख मॅट्रिक टन एवढ्या उसाचे विक्रमी गाळप केले आहे, असे असले तरी जिल्ह्यात आणखी मोठ्या प्रमाणात गाळपाअभावी ऊस शिल्लक आहे. जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत, असे जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जाहीर करून नुकताच शेतक-यांना दिलासा दिला आहे.

अंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि नळेगाव येथील जय जवान जय किसान साखर कारखाना मांजरा परिवारात सहभागी होऊन चालू होणार, कार्यक्षेत्रातील उसाचे वेळेत गाळप होऊन या उसाला समाधानकारक भाव मिळणार, हा विश्वास आता निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. हा निर्णय कळताच अनेक ठिकाणी शेतक-यांकडून आनंदोत्सव साजरा होत आहे.

दोन्ही कारखाने मांजरा परिवारात
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य बँकेने अंबुलगा आणि नळेगाव येथील साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्याची निविदा काढली असता जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यांचा आग्रह आणि त्यांचे हित लक्षात घेऊन सदरील कारखाने चालू करण्याच्या दृष्टीने ट्वेंटीवन शुगरने त्यासाठी निविदा दाखल केली होती. अगदी गुणवत्तेच्या कसोटीवर ही निविदा मंजूर झाली असून हे दोन्ही कारखाने आता मांजरा परिवारात दाखल झाले आहेत.

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर दोन्ही कारखान्यांचे मशनरी पूजन
अंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना आणि नळेगाव येथील जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना ट्वेंटीवन शुगरमार्फत आगामी वर्षात गाळप करणार असून, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते मशनरी पूजन करून मेंटेनन्सच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख यांनी दिली.

पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्यासह मांजरा परिवारातील सर्व साखर कारखान्याचे पदाधिकारी तसेच कारखाना परिसरातील मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. शनिवार दि. २ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजता अंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना मशिनरीची पूजा होईल. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता नळेगाव येथील जय जवान जय किसान सहकारी साखर कारखान्याच्या मशनरीची ऊस उत्पादक शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते पूजा होईल. या कार्यक्रमास कारखाना परिसरातील प्रमुख पदाधिकारी तसेच ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित राहतील, अशी माहिती विजय देशमुख यांनी दिली. आगामी वर्षात उसाची उपलब्धता लक्षात घेऊन दुरुस्तीचे काम लवकर केले जाणार आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या