जळकोट : ओमकार सोनटक्के
तालुक्यातील १३ ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी तसेच सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. तहसील कार्यालयात झालेल्या मतमोजणीत धक्कादायक निकालाची नोंद झाली. तालुक्यातील ज्या गावांमध्ये निवडणुका झाल्या त्या ठिकाणी, मतदारांनी सत्ताधारी पार्टीला बाजूला सारत नवीन उमेदवारांना संधी दिली. सरपंच पदासाठीही सदस्यांसाठीही ग्रामस्थांनी नवीन पॅनलला संधी देत सत्ताधा-यांना जबरदस्त हादरा दिला आहे..
जळकोट तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतीमधून जवळपास सात ते आठ ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व असून दोन ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात तर दोन ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत. यासोबतच तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या पाटोदा बुद्रुक येथील ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंंदे गटाच्या शिवसेनेने वर्चस्व स्थापन केले आहे तर तालुक्यात उद्धव ठाकरे सेनेनेही एका ग्रामपंचायतीवर यश मिळविले आहे. लाळी खुर्द येथील निवडणुकीत ग्रामस्थांनी सत्ताधारी गटाला बाजूला सारले हावरगा येथे सत्ताधारी गटाकडेच ग्रामपंचायत राहिली आहे तालुक्यात दुसरी मोठी ग्रामपंचायत असलेल्या गुत्ती येथे देखील सत्ता परिवर्तन झाले. पाटोदा बुद्रुक येथे देखील सत्ता परिवर्तन झाले आहे. या ठिकाणी भाजपा आणि शिंदे गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. जगळपूर येथेही सत्ता परिवर्तन झाले.
विजय उमेदवारांनी जळकोट या तालुक्याच्या ठिकाणी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला तसेच आपल्या गावामध्ये जाऊन मिरवणुका काढल्या. जळकोट येथील मतमोजणी प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुरेखा स्वामी व नायब तहसीलदार राजाराम खरात यांच्या नियोजनाखाली पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून म्हणून सचिन काडवदे, बालाजी चिंचोले, गोलंदाज आय. जे, त्रिपती जी. ए, अवल कारकून शेख, अलीम शारवाले, दासरवार यांनी काम पाहिले तसेच मतमोजणी प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घड ूनये म्हणून पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. तहसील परिसरामध्ये सहायक पोलिस निरीक्षक परकोटे यांचे बारकाईने लक्ष होते. तहसील परिसरात चार चाकी तसेच दुचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली होती .