जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यासाठी एकमेव अशी राष्ट्रीयीकृत स्टेट बँक इंडिया ही शाखा आहे , या शाखेमध्ये दररोज हजारो ग्राहक व्यवहार करण्यासाठी येत असतात परंतु या शाखेमध्ये सध्या ग्राहकांची प्रचंड हेळसांड होत आहे . नवीन मॅनेजर आल्यापासून ,स्टेट बँक इंडियाच्या ग्राहकांना प्रचंड अशा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्टेट बँक इंडिया जळकोट शाखेच्या कामकाजात सुधारणा करावी अशी मागणी अनेक ग्राहकांनी केली आहे.
जळकोट येथे एकमेव अशी स्टेट बँक इंडिया आहे.जी की राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेमध्ये ग्राहक गेल्यानंतर या ग्राहकांना चांगली वागणूक तसेच सांगली सेवा देण्याची गरज आहे परंतु या बँकेतील कॅशियर हे ग्राहकांना योग्य वागणूक देत नाहीत. ग्राहक बँकेमध्ये पैसे भरण्यासाठीकिंवा उचलण्यासाठी गेले असता त्यांना सरळ एसबीआय ग्राहक सेवा केंद्रावर जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. ग्राहकांनी येथेच पैसे भरायचे आहेत, असे सांगितल्यावरही, त्यांना पुन्हा अशा सूचना मिळत आहेत. याबाबत बँकेच्या मॅनेजरकडे तक्रार केली असतानाही एसबीआयच्या ग्राहक सेवा केंद्रावर जा असे सांगितले जात आहे.
ग्राहक बँकेत गेल्यानंतर या ग्राहकाचे सर्व काम बँकेत होणे गरजेचे असताना ग्राहक सेवा केंद्राचा येथील कर्मचा-यांना एवढा पुळका का असा सवालही देखील आता उपस्थित केला जात आहे . बँकेचे ग्राहक म्हणजे बँकेचे दैवत असते परंतु असे असताना येथील बँकेचे मॅनेजर व कॅशियर हे ग्राहकांना चांगली वागणूक देत नाहीत. पैसे भरण्यासाठी तसेच उचलण्यासाठी तासनतास थांबावे लागते.
काही विचारावयास गेल्यास योग्य उत्तर मिळत नाही, असे प्रकार अनेकदा घडत आहेत. स्लीप भरून दिली असता तुमच्याकडे एटीएम कार्ड नाही का, आहे म्हटल्यावर मग एटीएमने बाहेर पैसे उचला, असे सांगितले जात आहे यामुळे बँकेच्या अशा वागणुकीला ग्राहक कंटाळले आहेत .जळकोट मध्ये एखादी दुसरी राष्ट्रीयीकृत बँक असती तर जळकोट येथील एसबीआय शाखेला ग्राहकांचीकिंमत कळाली असती असे एसबीआय चे ग्राहकांचे म्हणणे आहे. लातूर येथील वरिष्ठ अधिका-यांनी जळकोटच्या एसबीआय बँकेकडे विशेष लक्ष देऊन या ठिकाणी ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी एसबीआयच्या अनेक ग्राहकांनी केली आहे.