लातूर : प्रतिनिधी राजस्थानमधील डॉ. अर्चना शर्मा यांच्या कथित आत्महत्येप्रकरणी आयएमएच्या लातूर शाखेच्या वतीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हॉस्पिटल ते गांधी चौकापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. डॉ. अर्चना शर्मा यांच्या आत्महत्येस जबाबदार असणा-या आरोपीना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित तीन आरोपी फरार आहेत.
त्यांनाही लवकरात लवकर अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, भविष्यात डॉक्टरांवर अशा प्रकारची वेळ येऊ देता कामा नये यासाठी हा कँडल मार्च काढण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही डॉक्टरबाबत डॉक्टर्स बोर्डाचा अहवाल येईपर्यंत डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाऊ नये, अशी मागणीही आयएमएच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, सचिव डॉ. मुकुंद भिसे, डॉ. डी. एन. चिंते, डॉ. वैशाली दाताळ, डॉ. रमेश भराटे यांनी उपस्थित १५० हुन अधिक डॉक्टर्सना मार्गदर्शन केले.