जळकोट : प्रतिनिधी
जळकोट येथील बाजार समितीची निवडणूक होऊ घातलेली आहे , बाजार समिती साठी दि ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दि २७ मार्च ते ३ एप्रिल हा उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी आहे. शुक्रवारी इच्छुकांनी २८ जणांनी ५२ नामनिर्देशन पत्र खरेदी केले तर तीन जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमोल वाघमारे यांनी दिली.
आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. शनिवारी आणि सोमवारी या दोन दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज इच्छुकांना भरावे लागणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीत सहकारी संस्था मतदारसंघ ४४५, ग्रामपंचायत मतदार संघ ३६५, व्यापारी मतदारसंघ २०८, हमाल व तोलारी मतदारसंघ ७०, असे एकूण १०८८ मतदार जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आहेत. जळकोट येथील कृषी बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ काही दिवस शिल्लक आहेत . यामुळे काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जात आहे . जागा कमी आणि इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे पक्षातील नेते मंडळीची डोकेदुखी वाढली आहे . योग्य उमेदवार कोण त्याच्या मागे किती मतदान हे आता विविध पक्षातील नेते मंडळी पहात आहेत .