लातूर : प्रतिनिधी
सैध्दांतीक आणि प्रात्यक्षिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती विकसीत व्हावी म्हणून वैज्ञानिक मंचची सुरुवात करण्यात आली आहे. या मंचच्या माध्यमातून दंत शिक्षण व दंतरोग उपचार या विषयीच्या ज्ञानाची देवाण-घेवाण करुन संशोधनाचे धडे दिले जात आहेत. दंत शाखेतील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शैक्षणीक अवस्थेतच संशोधनाचे धडे मिळत असल्यामुळे येणा-या काळात एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे विद्यार्थी हे दंत वैज्ञानिक होऊन देशासाठी सेवा देतील, असा विश्वास एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे यांनी व्यक्त केला.
एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील दंत शिक्षण विभाग आणि ओरल मेडिसिन व रेडिओलॉजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुस-या वैज्ञानिक मंच कार्यक्रमात डॉ. कांगणे बोलत होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. यतिशकुमार जोशी, ओरल मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी सुलतानपुरी, वैज्ञानिक मंचच्या सदस्या डॉ. शिल्पा केंद्रे, डॉ. पुनम नागरगोजे, डॉ. स्मिता चावरे, डॉ. प्रियंका लासुणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या काही वर्षांत दंत वैद्यकीय क्षेत्रात तांत्रिक आणि वैज्ञानिक नवकल्पना वेगाने विकसीत होत आहेत. दंत शाखेतील बदलते आयाम लक्षात घेवून नवीन कल्पना आणि आद्यावत तंत्राज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य रुजविण्याचे काम एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात केले जात असल्याचे सांगून डॉ. कांगणे म्हणाले की, बदलती जिवनशैली आणि व्यसनाधीनता यामुळे दंतरोग व मुख कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. वाढत्या दंतरोग व मुख कर्करोगाला आळा घालण्यासाठी प्राथमिक आवस्थेतच आजाराचे निदान होणे गरजेचे आहे. त्यासाठी दंत रोगाची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ दंतरोग तज्ञाकडून तपासणी करुन उपचार घ्यावेत.
यावेळी दुस-या वैज्ञानिक मंचचे सादरीकरण ओरल मेडिसिन व रेडिओलॉजी विभागाच्या वतीने करण्यात आले. यामध्ये डॉ. विजयालक्ष्मी सुलतानपुरी यांनी ‘लिक्विड बायोप्सी इन ओरल कॅन्सर आधुनीक निदान व तंत्रज्ञान’ या विषयावर सादरीकरण करुन विस्तृत माहिती दिली. डॉ. प्रियंका लासुणे यांनी ‘मौखिक घातकतेच्या स्क्रीनिंगसाठी क्रिस्टलायझेशन चाचणी : लवकर शोधण्याचे मार्ग’ या विषयावर सादरीकरण केले. तर बी.डी.एस. आंतरवासिता विद्यार्थीनी मयुरी कोथळे हिने ‘किरणोत्सर्गाच्या दिशेने ज्ञान आणि आकलनाचे मूल्यांकन’ या संरक्षण नियमावलीवर सादरीकरण केले. वैज्ञानिक मंचावर सादरीकरण केलेले मार्गदर्शक डॉ. विजयालक्ष्मी सुलतानपुरी, डॉ. प्रियंका लासुणे, मयुरी कोथळे यांना प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे व उपप्राचार्य डॉ. यतिशकुमार जोशी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी काटपुरे हिने करुन आभार मानले.