शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शिरूर अनंतपाळ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे नऊ उमेदवार निवडून आल्याने त्यांची सत्ता आबाधित राहिली आहे. तर महा विकास आघाडीने आठ जागा जिंकून चांगले यश संपादन केलेले आहे. नगराध्यक्ष पदावर भाजपाचा उमेदवार बसणार हे निश्चित असले तरी आरक्षण कोणत्या प्रवर्गाला सुटेल हे निश्चित नसल्याने शिरूर अनंतपाळ शहराचा तिसरा नगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून शहरात चर्चेला उधाण आले आहे.
शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीने नऊ जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती. यात पहिला नगराध्यक्षा होण्याचा मान सौ. भाग्यश्री अमर देवंगरे यांना मिळाला होता. तर दुसरा नगराध्यक्षा होण्याचा मान शोभाबाई नरसिंग गायकवाड यांना मिळाला होता. एकूणच भाजपाने पाच वर्षे पूर्ण करत सत्ता राखली होती.
नगरपंचायत च्या दुस-या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा व महा विकास आघाडीच्या घटक पक्षात चुरशीची लढत होऊन यात सत्ताधारी भाजपाला नऊ जागा जिंकून काठावर बहुमत मिळाले, तर महा विकास आघाडीतील शिवसेनेला चार, राष्ट्रवादीला तीन तर एक जागा काँग्रेसने जिंकल्याने महाविकास आघाडीला आठ जागांवर यश मिळविता आले.सध्या नऊ जागा जिंकलेल्या भाजपाकडे बहुमत असून नगराध्यक्षपदी भाजपा नेते कोणाची निवड करतीत हे सोडतीनंतर स्पष्ट होईल.