लातूर : प्रतिनिधी
औसा तालुक्यातील आशिव या छोट्याशा गावचा पंधरा-सोळा वर्षांचा शाळकरी मुलगा निखील भागवतराव बंडगर याच्या हातातील चित्रकलेचे कौशल्य सध्या सर्वांच्या कुतूहलाचा विषय आहे. हातातल्या उपजत कलाकौशल्यामुळे केवळ पेन्सीलने पोर्ट्रेट रेखातो. चित्रकलेची घरात कसलीही परंपरा नसताना, चित्रकला शिकवणारे गुरु नसताना त्याचे हात आपल्या चित्रातून भाव-भावना असे अविष्कृत करतात की, ती कलाकृती आपल्यासमोर सजीव होऊन जाते.
शेतकरी कुटूंबातील निखीलचे सातवीपर्यंचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. आठवीला लातूरच्या श्री देशिकेंद्र विद्यालयात दाखल झाला. त्याचे छंद काय आहेत किंवा काय असावेत याकडे लक्ष दयायला तसे गावात वातावरही नव्हते. चौथी-पाचवीत असताना एकदा निखीलने कागदावर महादेवाचे चित्र काढून आपल्या सगळ्या सवंगड्याना दाखवले. ते चित्र सर्वांच खुप आवडले. शिक्षकांनीही पाठ थोपटली. आई-वडीलही खुप आनंदी झाले. निखीलने फोटोवरुन पोर्ट्रेट काढायला सुरुवात केली. हे सर्व तो आत्मविश्वासाने करीत राहिला. बघता बघता त्याची चित्रकला शाळेतील सर्व मित्र, शिक्षक, नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचली. वडीलांच्या कानावर ही गोष्ट पडताच तेही आनंदी झाले. अंगी मुरलेली चित्रकलेची उर्मी त्याच्या पावलांना आपल्याकडे वळवू लागली. आपले स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्याच्या लढाईची ती सुरुवात होती.
पुढे निखीलने मुंबईच्या जे. जे. स्कुल
ऑफ आर्टमध्ये फाईन आर्टला प्रवेश घेतला. तेथील दिग्गजांकडून या क्षेत्रातील सर्व तंत्रे मन लावुन शिकतो आहे. शाळेत असताना मोबाईल अॅपवरुन चित्रकला शिकणारा आपल्या मातीतला निखील भविष्यात याच क्षेत्रात आपले करीअर करण्याचा आणि नामांकित गॅलरीत आपल्या स्वत:च्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्याचा मानस निखीलने आत्मविश्वासपुर्वक बोेलून दाखवला.