निलंगा : लक्ष्मण पाटील
राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत गट व गणामध्ये बदल झाले आहेत. यात निलंगा तालुक्यात दोन गट व चार पंचायत समिती गण वाढले आहेत. तर शेडोळ व कासारबालकुंदा गटाचे गणामध्ये रूपांतर झाले आहे. तालुक्यात दोन गट व चार गण वाढल्याने आता जिल्हापरिषदेचे ११ गट व पंचायत समितीचे २२ गण झाले आहेत .
निलंगा तालुक्यात आगोदर नऊ जिल्हापरिषद गट व १८ पंचायत समिती गण होते. यात औराद शहाजानी, कासारशिरशी, कासारबालकुंदा, आंबुलगा (बु), हलगरा, निटूर, सरवडी, मदनसुरी, शेडोळ या जिल्हापरिषद गटाचा समावेश होता. आता निटूर व शेडोळ गटातील कांही गावे तोडून नवीन पानंिचचोली गट तयार करण्यात आला आहे. तर शेडोळ हा जिल्हा परिषद गट असलेला पंचायत समिती गण झाला आहे. निटूर जिल्हा परिषद गट कायम असून यामध्ये शिरोळ-वांजरवाडा हा पंचायत समिती नवीन गण तयार झाला आहे.
निलंगा शहरालगत असलेला दापका हा नवीन गट तयार झाला असून त्या गटांतर्गत पूर्वीचा लांबोटा गण कायम आहे. औरादशहाजानी गटामध्ये ताडमुगळी हा नवीन गण तयार झाला असून त्यातील बोरसुरी गणाचे आता जिल्हापरिषद गटामध्ये रूपांतर झाले आहे. शिवाय यामध्ये नवीन पंचायत समिती गण म्हणून अनसरवाडा हा अस्तीत्वात आला आहे. कासारसिरसी जिल्हा परिषद गटातील बडूर पंचायत समिती गण संपुष्टात आला असून येथे नवीन कोराळी हा गण करण्यात आला आहे.
कासारबालकुंदा या गटाचे पंचायत समिती गणामध्ये रुपांतर करण्यात आले असून तेथे तांबाळा गणाचे जिल्हा
परिषद गटामध्ये रूपांतर करण्यात आले आहे. नवीन पुनर्रचनेत तांबाळा गट झाला असून कासारबालकुंदा हा गण झाला आहे. मदनसुरी गटातील नणंद पंचायत समिती गण संपुष्टात आला असून येथे आता नव्याने रामंिलग-मुदगड गण तयार करण्यात आला आहे.