लातूर : प्रतिनिधी
बंदी असतानाही होत असलेल्या प्लास्टिक वापराविरोधात महानगरपालिकेने आता दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. प्लास्टिक कॅरीबॅग वापरणा-या व्यावसायिकांकडून बुधवार दि. १९ जानेवारीपर्यंत २५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कायद्यान्वये प्लास्टिक कॅरीबॅग वापरास बंदी आहे. तरीदेखील बाजारपेठेत व्यापा-यांकडून कॅरीबॅगचा वापर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महानगरपालिकेकडून त्याविरोधात धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. विविध व्यावसायिक, दुकानदार आणि हातगाडे चालक प्लास्टिक कॅरीबॅग वापरत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या जप्त करुन संबंधितांना दंड ठोठावला जात आहे. यासाठी महानगरपालिकेकडून स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने शहराच्या विविध भागात कारवाई करत बुधवार दि. १९ जानेवारीपर्यंत २५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. व्यवसायिकांनी बंदी असणा-या कॅरीबॅग ऐवजी कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.