लातूर : प्रतिनिधी
यंदाचा उन्हाळा जरा जास्तच कडक असल्याचा अनुभव सर्वानाच येतो आहे. कडक उन्हामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे भाव वधारल्याने ते आता सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहेत. टोमॅटो, हिरवी मिरची, लसून, गवार या भाज्यांनी खुपच भाव खाल्ला आहे. किचन बजेट कोलमडले आहे.
गेल्या महिन्यापासून लातूरच्या भाजी मंडईत भाजीपाल्याची आवक घटली आहे. गेल्या पंधरा दिवसांपुर्वी ४० रुपये किलो असा दर असलेले टोमॅटो आजघडीला ८० रुपये किलोने विकले जात आहेत. मेथी, चुका, शेपू, शेवगा, वांगे, दोडका, गवार, भेडी, काकडी, कांदा, बटाटे, लसून, हिरवी मिरची, कोथिंबीर, पत्ता कोबी, फुल कोबी, बीट आदी भाज्यांचे दर वाढले आहेत. भाज्याच्या वाढत्या दरासोबतच जीवनावश्यक वस्तूंच्याी किंमती वाढल्याने किचन बजेट कोलमडले आहे. काही दिवसांपुर्वी मेथीची जुडी दहा रुपयांना मिळायची. सध्या ती २५ ते ३० रुपयांना विकली जात आहे. शेपू, पालकाची पेंढी १५ रुपयांना तर चुका १० रुपयांना मिळत आहे. वांगे, दोडका, भेंडी १५ ते २० रुपयांना पावकिलो मिळत आहे.
भाजीपाल्याचे दर वधारले असले तरी फळांच्या बाबतीत मात्र जरा सुखद वातावरण दिसून येत आहे. सध्या आंब्यांचा सीझन आहे. त्यामुळे बाजार पेठेत विविध प्रकारचे आंबे आलेले आहेत. केशर, मलगोबा, कलमी या आंब्यांची आवक असली तरी गावरान आंबा मात्र अद्यापही बाजार पेठेत दिसत नाही. शंभर रुपये ते ३५० रुपये किलो या दराने आंब्यांची विक्री होते आहे. टरबुज, खरबुज, पपई, पेरु आदी फळाच्ांी आवक ब-यापैकी असल्याने फळांचे भाव जेमतेम आहेत.