19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeलातूरभूमीअभिलेखच्या कर्मचा-यांची नागरिकांना अरेरावीची भाषा

भूमीअभिलेखच्या कर्मचा-यांची नागरिकांना अरेरावीची भाषा

एकमत ऑनलाईन

रेणापूर : सिध्दार्थ चव्हाण
रेणापूर येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील वर्ग- ३ च्या कर्मचा-यांची गेल्या १ ते दिड वर्षापासून ६५ टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त असून या रिक्त पदांचा अतिरिक्त पदभार अन्य कर्मचा-यावर पडत आहे. त्यामुळे कार्यालयात येणा-या नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. त्याबरोबरच कार्यरत कर्मचारी येणा-या नागरिकांना व्यवस्थित न बोलता आरेरावीची भाषा वापरत आमचे कोणीही काही करू शकत नाहीत अशा अविर्भावात वावरताना दिसत आहेत. तेव्हा रिक्त असलेली पदे तत्काळ भरावीत तसेच नागरिकांना अरेरावी करणा-­या कर्मचा-­यावर कार्यवाही व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

उप अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या शेत – जमीन मोजणे, एकत्रीकरणाची फाळणी, अपील, ईपीसीआयएस, मिळकत पत्रिकेचे डिजिटल सिग्नेचर, नकलेचे अर्ज, कोर्ट कमिशन, कोर्टवाटप प्रकरणे, सनद फी, महास्वामीत्व योजने अंतर्गत गावठाण चौकशीची कामे केली जातात. या कार्यालयाच्या आस्थापनेवर वर्ग ३ ची १२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ चार कर्मचारी कार्यरत असून एक कर्मचारी वैद्यकीय रजेवर आहे. वरील मंजूर पदांपैकी सात पदे (६५ टक्के) रिक्त आहेत. यापैकी बहुतांश पदे ही साधारणत: एक ते दिड वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून रिक्त आहेत. रेणापूरच्या उप अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडे एकत्रीकरणांची फाळणी, बारवरील अपील प्रकरणे नगर भूमापणकडील ई-पीसीआयएस, मिळकत पत्रिकेचे डिजिटल सिग्नेचर,नकलेचे अर्ज, कोर्टकमिशन, कोर्टवाटप प्रकरणे, सनद फी, महास्वामीत्व योजनेंतर्गत गावठाण चौकशीची कामे करण्यासाठी कार्यालयात पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे जनतेच्या कामांचा निपटारा वेळेवर करणे शक्य होत नाही.

शिवाय वरिष्ठ कार्यालयाकडून वेळोवेळी विविध संकलनाची माहिती देण्याचे कामही याच कर्मचा-यांंना करावी लागतात. कार्यालयातील कर्मचा-याच्या कमतरतेमुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे व वरिष्ठांकडून मागविलेल्या माहिती संकलनाची कामे वेळेवर होत नाहीत. कार्यालयात सध्या उपअधीक्षक. आर. वाय.भाबड, मुख्यालय सहायक आर . शिंदे, रजेवर आहेत तर भूमापक पी. लखनगीरे, छाननी लिपिक व्ही. टी. वरवटे, अभिलेखपाल एल.आय. शेख या चार कर्मचा-यांवरच तालुका उप अधीक्षक भूमिअभिलेख कार्यलयाचा कारभार चालतो. याच कर्मचा-यांना वरील सर्व कामे करावी लागत आहेत. त्यामुळे या कर्मचा-यांंना त्यांच्या मुळपदा व्यतिरिक्त अन्य रिक्त पदांचाही अतिरिक्त पदभार दिला जात आहे.

या कर्मचा-यांना अतिरिक्त पदभार दिल्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामांचा ताण पडत असून त्यामुळे हे कर्मचारी सतत मानसिक तणावात असतात. एखादी व्यक्ती कामानिमित्त कार्यालयात गेली तर त्यांची ऐकून घेण्याचीही मनस्थिती त्यांची नसते.त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.रेणापूर येथील उप अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाच्या वाढत्या कामांचा भार लक्षात घेता आस्थापनेवर वर्ग ३ ची जी १२ पदे मंजूर आहेत. ती तात्काळ भरावीत किवा रिक्त पदावर प्रतिनियुक्तीवर कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांतून केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या