निलंगा : बुद्ध ,बसवेश्वर ,शिवाजी महाराज, फुले ,शाहू ,आंबेडकर यासह विविध महापुरुषांनी अनेक जातीत जन्म घेतले परंतु त्यांचे कार्य एका जातीपुरते मर्यादित नव्हते म्हणून कोणत्याही एका जाती-धर्माचा विचार न करता संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणा-या महापुरुषांना एका जातीत बंदीस्त करू नका असे आवाहन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. श्रीपाल सबनीस यांनी केले.
निलंगा येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, ंिलंबन महाराज रेशमे, पंडितराव धुमाळ, टी. टी. माने, डॉ.अरंिवद भातांब्रे, शिवाजी माने ,विनोद आर्य, विलास सुर्यवंशी, प्रा. रोहित बनसोडे, रजनीकांत कांबळे, विलास माने, अजित माने, हमीद शेख, दयानंद चोपणे, इस्माईल लदाफ, धम्मानंद काळे, अविनाश रेशमे, हरीभाऊ सगरे हे मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. सबनीस म्हणाले की, आज समाजकारण व राजकारण चुकीच्या दिशेने जात आहे.
महापुरुषांना जातीच्या चौकटीत मर्यादित करून तथाकथित विद्वान समाजात फूट पाडत आहेत.देशाच्या राज्यघटनेला कोणताही जात-धर्म नसतो. भारतीय संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी असून ती जीवन जगण्याची प्रेरणा देते. बाबासाहेबांचे कार्य हे विश्ववंदनीय आहे. बाबासाहेब फक्त दलिताचे नव्हते. शेतकरी,शेतमजूर, कामगार यांच्यासह समाजातील विविध घटकांसाठी त्यांनी व्यापक कार्य केले आहे.
महापुरुषांच्या व जाती धर्माच्या नावावर राजकीय पुढा-यांनी सुरू केलेली दुकानदारी ही समाजाची शोकांतिका आहे. याप्रसंगी समाजात वाचन संस्कृती वाढावी म्हणून सर्वधर्मीय सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने भारतीय संविधान व महात्मा फुले यांच्या गुलामगिरी या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रोहित बनसोडे यांनी तर आभार विलास सूर्यवंशी यांनी मानले.