26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरमाजी प्राचार्य सदाविजय आर्य यांचे निधन

माजी प्राचार्य सदाविजय आर्य यांचे निधन

एकमत ऑनलाईन

निलंगा : तालुक्यातील औराद शहाजानी येथील मास्टर दिनानाथ मंगेशकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सदाविजय बन्सीलाल आर्य यांचे दि. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी ते वय ८३ वर्षाचे होते.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील मास्टर दिनानाथ मंगेशकर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी १९७४ ते ९२ या कालावधीत आपले शैक्षणिक योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात गान कोकिळा लता मंगेशकर यांचा देशातील पहिला खुल्या मंचावरील संगीत रजनीचा कार्यक्रम औराद शहाजानी येथे झाला होता. आंतर भारती संस्थेच्या अंतर्गत १९८४ साली त्यांनी औराद येथे रमामाता आंबेडकर महिला अध्यापिका विद्यालयाची स्थापना केली होती. ग्रामीण भागातील साधारणत: अडीच हजार मुलींना शिक्षिकेचे प्रशिक्षण देऊन तयार केले. या संस्थेत थोर समाजसेवक बाबा आमटे यांना औराद येथे आमंत्रित करून वृक्षारोपण केले. ग्रामीण भागात आंतरजातीय विवाह चळवळ उभी केली. ग्रामीण भागातील मुलींना प्रतिवर्षी त्यांनी भारत दर्शन घडवून आणले, एक उत्कृष्ट फोटो ग्राफर देखील ते होते. त्यांनी यदुनाथ थत्ते, बाबा आमटे, एस. सुब्बाराव आदि थोर समाजसेवका सोबत काम केले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामात त्यांचे वडील बंसीलाल व चुलते शामलाल आर्य यांचे मोठे योगदान होते. स्वातंत्र्य सेनानींचे वारसदार म्हणून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान औराद येथील पंडित वीरभद्रजी आर्य विद्यालयात त्यांना गौरविण्यात आले होते.

निजाम संस्थानातील कर्नाटकातील हाळ्ळीखेड तालुका भालकी हे त्यांचे मूळ गाव आहे. उदगीर येथील श्यामलाल स्मारक विद्यालयाचे ते माजी अध्यक्ष होते. साने गुरुजींच्या प्रेरणेतून चालू केलेल्या आंतर भारती संस्थेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जागीच मृत्यू झाला. मरणोत्तर देहदानाचा त्यांनी संकल्प केला होता. अशी माहीती नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते अ‍ॅड. सुपोशपानी आर्य व विमा प्रतिनिधी आशिषप्रिय आर्य यांचे वडील होत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या