लातूर : प्रतिनिधी
शरीरासोबतच योगा मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतो. कोरोनामुळे लोकांना चिंता, नैराश्य यांसारख्या मानसिक व शारीरिक समस्यांनाही सामोरे जावे लागले. जे सध्या मानवतेसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे मानवतेसाठी योगाचा उपयोग केला पाहिजे असे प्रतिपादन डॉ. संदिपान जगदाळे यांनी केले.
दयानंद शिक्षण संस्था अंतर्गत आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग शिबिरास ते बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके, प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला, प्राचार्य डॉ. क्रांती सातपुते, प्राचार्य डॉ. पूनम नाथानी, प्राचार्य प्रीती पटवारी, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व ७३८ योगासन प्रशिक्षणार्थी याप्रसंगी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे यंदा आठवे वर्ष आहे. भारतीय योग विद्येतून जगाला मानवतेचा संदेश दिला जात असल्याचे सांगून डॉ. जगदाळे म्हणाले की, भारतासोबतच आता संपूर्ण जग योगाचा स्वीकारत करीत आहे. हा एका अर्थाने भारतीय संस्कृतीचा विजय आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त आयोजित योग शिबिरात डॉ संदिपान जगदाळे व प्रा नरेश हलकी यांनी योग प्राणायाम व ध्यान याचे धडे दिले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी क्रीडा संचालक डॉ. अशोक वाघमारे, डॉ. नितेश स्वामी, डॉ. महेश बेंबडे, डॉ. विक्रम चिंते, प्रा. विलास कोमटवाड, विकास खोगरे व प्रीतम मुळे यांनी परिश्रम घेतले.