लातूर : एजाज शेख
लातूर शहरात दररोज ९० टन ओला तर ८० टन सुका असे एकुण १७० टन कचरा निघतो. ८४ घंटागाड्यांच्या माध्यमातून सकाळी ६ ते सायंकाळपर्यंत हा घनकचरा घरोघरी जाऊन संकलीत केला जातो. प्रत्येक घंटागाडीवर ३ कर्मचारी असतात. मात्र एवढी मोठी यंत्रणा असूनही कचरा संकलनाच्य कामात खोटी होत असल्याचे चित्र सद्या दिसून येत आहे. लातूर शहरातील घनकचरा व्यवस्थापनासंदर्भाने लातूर शहर महानगरपालिकेने शहरातीलच एका सेवाभावी संस्थेसोबत करार केलेला आहे. करारात अनेक गोष्टी नमुद आहेत. परंतू, संबंधीत संस्था कराराप्रमाणे काम करीत आहे की, नाही याची चाचपणी महानगरपालिकेच्या यंत्रणेकडून होत की नाही?, असा प्रश्न उपस्थित होतो.
कारण घनकचरा व्यवस्थापन करणा-या संस्थेकडून कच-याची निडपणाने विल्हेवाट लावली जात नसल्याचे दिसुन येत आहे. घरोघरी जाऊन ओला, सुका कचरा संकलीत करणे, संकलीत कच-यावर प्रक्रिया करणे, प्रक्रिया करुन उरलेल्या कच-याची विल्हेवाट लावणे, आदी गोष्टी करारात नमुद असल्यातरी असे होत नाही. घनकचरा व्यवस्थापन करणारी संस्था पुर्ण क्षमतेने काम करीत आहे काय? यावरही लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष नाही. लक्ष असते तर शहरात जागोजागी कचरा दिसलाच नसता. घनकचरा व्यवस्थापन करणारी संस्था जर दररोज १७० टन कचरा उचलत असेल तर ठिकठिकाणी कच-याचे ढिग कसे दिसतात, हा संशोधनाचा विषय आहे. कचरा संकलन करतानाच कच-याचे विलगीकरण दिलेल्या निर्देशानूसार होते का?, हे पाहण्याची यंत्रणाच महानगरपालिकेकडे नसावी, असे निदर्शनास येते.
यंत्रणाच ढिसाळ
नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करुन स्वच्छतादुताकडे द्यावा, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी आपापल्या घरी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासाठी दोन बकेटी ठेवल्या. घंटागाडी दारावर आल्यानंतर नागरिकांकडून ओला व सुका कचरा विलगीकरण करुन दिला जायचा. मात्र नागरिकांसमोरच घंटागाडीमध्ये हा विलगीकरण केलेला ओला व सुका कचरा एकत्र टाकला जायचा. त्यामुळे आपण घरामध्ये कच-याचे विलगीकरण केलेला कचरा जर घंटागाडीत एकत्रच टाकला जात असेल तर घरात कच-याचे विलगीकरण कशाला करायचे?, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. कचरा संकलन करणारी यंत्रणाच ढिसाळ असल्यामुळे दिसून येत आहे.