रेणापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील रामवाडी (खरोळा) येथे गुरुवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तिघांच्या घराच्या दरवाजचे कुलूप तोडून घरातील ७ तोळे ९ ग्रॅमचे सोन्याचे दागिने व १ लाख ६४ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
एकाच रात्री तिघांच्या घरफोड्या झाल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.रामवाडी (खरोळा ता . रेणापूर ) येथील ज्ञानोबा कोंडीबा शिंगडे,श्रीनिवास नामदेव उगीले व पांडुरंग तुळशीराम दिवटे या तिघांच्या घराचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप कोंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील ७ तोळे ९ ग्रॅम चे सोन्याचे दागिने (अंदाजे किमंत १ लाख ९७ हजार ५००) व १ लाख ६४ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. सदर घटना गुरुवारी दि २९ रोजी मध्यरात्री ते ३० एप्रिलच्या पाहाटेच्या सुमारास घडली. याबाबत ज्ञानोबा कोंडीबा शिंगडे रा रामवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेणापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुरंन व १०३/ २३ कलम ४५७, ३८० भा. द. वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती निर्मळ हे करीत आहेत