शिरुर अनंतपाळ : तालुक्यातील साकोळ येथील हाजी इस्माईल बागवान यांच्या घराला शुक्रवारी (दि. २१) दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत संसारोपयोगी साहित्यासह शेतमाल जळून खाक झाला. लग्न घर असलेल्या घरावर हे मोठे संकट कोसळल्याने बागवान कुटूंबीय उघड्यावर आले आहे.
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील हाजी इस्माईल बागवान यांच्या नातीचे लग्न असल्याने सर्वजण लग्न समारंभामध्ये व्यस्त होते. दरम्यान बागवान कुटूंबीय लग्नात व्यस्त असताना अचानक आग लागल्याने आगीत संसारोपयोगी साहित्य सोयाबीन २५ कट्टे, तुर १० कट्टे, फवारणी यंत्र, कपडे, ज्वारी, सायकल असे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. आगीचे लोट व धूरामुळे पाहुण्यांची चांगलीच धावपळ झाली. आग विझविण्यासाठी खूप प्रयत्न केले पण तोपर्यंत सर्व काही जळून खाक झाले होते.
घटनेनंतर मकसूद बागवान, लायक बागवान, अब्दुल अजीज मुल्ला, संतोष डोंगरे यांनी तहसीलदारांकडे निवेदन दिले आहे. नुकसानीचा त्वरित पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.