लातूर : लातूर ग्रामीण मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव तत्पर असलेले आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे रेणापूरमधील विविध विकासकामांसाठी मंजूर झालेल्या ९.६० कोटी रुपयांच्या कामांचा व मतदारसंघातील विविध विकासकामांचा शुभारंभ लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते रेणापूर येथे होणार आहे.
रेणापूर येथील रेणुकादेवी मंदिर सभागृह येथे गुरुवार दि. २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता हा शुभारंभ सोहळा होणार आहे. येथे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते विकासकामाचा शुभारंभ होणार आहे. यावेळी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याचवेळी उर्वरित १६ प्रभागात विकासकामांचा शुभारंभ नगरसेवक, पदाधिकारी यांच्या हस्ते होणार आहे.
आमदार धिरज देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे ‘लातूर ग्रामीण’मध्ये विविध विकासकामे सुरू आहेत. त्यांच्याच प्रयत्नांमुळे रेणापूरमधील विविध विकासकामांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून मंजूर झालेल्या व आमदार निधीतून मंजूर केलेल्या ९.६० कोटी रुपयांच्या कामांचा, तसेच, ‘लातूर ग्रामीण’ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. यात सिमेंट व डांबरी रस्ते, नाली काम, सभागृह, स्मशानभूमी सुशोभीकरण, सभामंडप, समाजमंदिर अशा विविध विकासकामाचा समावेश आहे.