रेणापूर : प्रतिनिधी
लातूर आणि नांदेडचं वेगळं नातं असून विकासाची परंपरा जपणारं आहे. लातूर जिल्ह्याला विकासाबाबतीत झुकतं माप देण्याची परंपरा कायम ठेवणार आहोत. लातूर जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकासामुळे दळणवळणास व उद्योगवाढीस मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिपादन केले.
रेणापूर तालुक्यातील मौ. खरोळा येथे लातूर जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन खरोळा ता. रेणापूर येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, विशेष उपस्थितीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख, सहकार, कृषी, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम, राज्याचे पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, आमदार अमर राजूरकर, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, सावजनिक बांधकाम नांदेड मंडळाचे मुख्य अभियंता ब . शि. पांढरे, लातूर मंडळाचे अधिक्षक अभियंता सलीम शेख, सावजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दे. भु. निळकंठ आदि विविध मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
मराठवाड्यातील लोकांना विकासाची भूक आणखीनही संपलेली नाही. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत कोविड-१९ ने थैमान घातले होते. त्यामुळे विकासात्मक कामाऐवजी आरोग्य यंत्रणा, नवीन हॉस्पिटल निमित्ती तसेच अद्ययावत मेडिकल महाविद्यालयाची त्यातील सुविधा निर्माण करण्यावर निधी मिळालेला आहे, यातून आरोग्य यंत्रणा भक्कम करण्यावर शासनाने भर दिलेला आहे. जो काम करतो, तो राजा असतो, या उक्तीप्रमाणे चांगली कामे करुन सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विकासात्मक कामांना प्राधान्य भविष्यात देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
तसेच लातूर येथील रिंगरोड देण्याबाबत एशियन डेव्हलमेंट बँकेच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावणे, तसेच लातूर – नांदेड रेल्वे जोडणी आहे, परंतु, लातूर ते नांदेड दळणवळणासाठी रेल्वने २०० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी एकूण पाच तास लागत आहेत. यातून नागरिकांची हेळसांड होत आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून हे अंतर एका तासामध्ये लातूर-नांदेड प्रवास करता यावा यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. रेणापूर येथील कांही नागरिकांच्या भूसंपादनाचा निधी मिळाले नसल्याची कांही प्रलंबित तक्रारी आहेत. त्यासाठी आवश्यक लागणारा निधी निश्चित करण्यात येवून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्नही केला जाणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
पालकमंत्री अमित देशमुख मार्गदर्शन करतांना म्हणाले की, जिल्ह्यात रस्त्याचं जाळ उभं करण्याची लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी भुमिका मांडली त्यांबद्दल त्यांचही कौतुक, शासन जनसामान्यांचा विकासासाठी प्रयत्नशिल असून विकास करतांना सकारात्मक विचार ठेवून स्पर्धात्मकरितीने काम करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करित असतो.
राज्यात नांदेड, लातूर महाराष्ट्राच्या राजकारणात समीकरण वेगळं असून लातूरला विकासाबाबतीत लातूरसाठी झुकतं माप देण्याची परंपरा स्व. शंकरराव चव्हाण यांच्यापासूनची आहे, त्याबाबतीत आम्ही ऋणी आहोत, त्यांच्या ऋ णातच कायम राहू. त स्व. शंकरराव चव्हाण यांनी पुर्वीच्या काळात स्व. विलासराव देशमुख यांच्यावर विश्वास ठेवून बारा खाती साभाळण्याची जबाबदारी दिली, विलासराव देशमुख यांनी ती जबाबदारी पूर्ण केले होते. ते आमच्या आजही कायम स्मरणात राहणार आहे.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, लातूर ग्रामीण मतदार संघातील आज ३७ पैकी २२ रस्त्यांच्या कामाची आज सुरुवात झाली आहे. जशा आपल्या शरीरातील रक्तवाहिनी चांगल्या असतील तर आपले शरीर साथ देते त्याचप्रमाणे दळणवळण रस्ते चांगले दर्जेदार असली पाहिजेत, असे सांगून लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी शुभेच्छाही दिल्या.
राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, आपण कोरोनावर यशस्वी मात करुन आता विकास कामांवर भर देत आहोत. त्यामुळे मराठवाड्याच्या रस्ते कामांना गती प्राप्त होणार आहे. तसेच सन २०२४ पर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे जलजीवन मिशनचेतंर्गत शुध्द व पुरेसा आणि शाश्वत पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे, असे श्री. बनसोडे यांनी सांगितले.
राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले की, रस्त्यांचा विकास झाल्याने राज्याची अर्थव्यवस्था भक्कम होण्यास मदत मिळणार आहे. तसेच सर्वसामान्य वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात म्हणून पालकमंत्री अमित देशमुख प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.