लातूर : प्रतिनिधी
लातूर सायकलिस्ट क्लबच्या दहा सायकलस्वारांनी दि. २३ जानेवारी रोजी लातूर-अंबाजोगाई-घाटनांदूर-धर्मापूरी आणि याच मार्गाने परत लातूर असा एकुण १६५ कि. मी. चा प्रवास एकाच दिवशी पूर्ण केला. क्लबचे नुतन अध्यक्ष श्रीरंग चापोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सायकल सफारीचे आयोजन करण्यात आले होते. धर्मापूरी येथील अतिप्राचीन हेमाडपंथी श्री केदारेश्वर मंदिर असुन उत्तम शिल्पकलेचे प्रतिक असलेले महादेवाचे असे हे मंदिर आहे. बालाघाटच्या डोंगराच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य असे धर्मापूरी हे छोटेसे खेडेगाव पण तिथल्या या शिल्पकलेमुळे पर्यटकांचे आकर्षण असलेले हे केदारेश्वर मंदीर पाहण्याचा मोह कुणाला झाला नाही तर नवलच आहे, असे हे केदारेश्वर मंदीराचे दर्शन करण्याचे, पुरातन वास्तुचे, आपल्या हिंदु संस्कृतीचे जतन करण्याचे आणि त्याची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी सायकलस्वारी करुन एक सामाजीक संदेश देण्यासाठी त्याच बरोबर आरोग्यासाठी सायकलिंगचे महत्व पटवून देण्यासाठी या सायकल सफारीचे आयोजन करण्यात आले होते.
या सायकल सफारीसाठी लातूर सायकलिस्टचे क्लबचे अध्यक्ष श्रीरंग चापोलीकर, उपाध्यक्ष श्रावण उगले यांनी पुढाकार घेतला होता. या सायकल सफारीमध्ये क्लबचे माजी अध्यक्ष सतिष खोबरे, सदस्य प्रफुल्लचंद्र कुलकर्णी, श्रीपाद अघोर, गंगाधर बिरादार, नागेश टाले, प्रविण करवले, बालासाहेब आकुसकर, संजय महाजन आदींनी सहभाग नोंदवला होता.