विलासनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या जयंती निमित्ताने दि. २६ मे रोजी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.
कारखाना साइटवर लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी मंत्री सहकार महर्षी, कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख, व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, जागृती कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे, साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, जिल्हा बँकचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, रेणाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, संत शिरोमणी मारुती महाराज कारखान्याचे व्हाईस चेअरमन शाम भोसले, मांजरा कारखाना संचालक मंडळ, कार्यकारी संचालक पंडित देसाई, खाते प्रमुख आदींनी पुष्पांजली अर्पण केली.
त्यानंतर कारखान्यातील कामगारांसाठी सर्वरोग निदान व नेत्र तपासणी तसेच मोफत चष्मा वाटप शिबिर घेण्यात आले. सर्वरोग निदान शिबिराच्या यशस्वितेसाठी सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. हनुमंत किनीकर व त्यांचे सहकारी डॉ. अमोल शेकडे पाटील, डॉ. सुदर्शन गुंठे, डॉ. प्रमोद लोकरे, डॉ. नलावडे यांचे व नेत्र तपासणी शिबिरासाठी जमादार हॉस्पिटलचे डॉ. इम्रान व मोफत चष्मा वाटपासाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर अक्षरा ऑप्टिकल व आय केअर रेणापुरचे ऑप्टिशियन भागवत डी. टमके यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदरील शिबिरामध्ये एकूण साडेतीनशे कारखाना कामगारांची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली तसेच १५० कर्मचा-यांना मोफत चष्म्यांचे वाटप मांजरा कारखाना व अक्षरा ऑप्टिकल व आय केअर रेणापुर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.