निलंगा : प्रतिनिधी
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दैनंदिन अध्ययन व करिअर सिद्धीसोबतच आपल्या आई-वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी, गीतकार डॉ.विनायक पवार यांनी केले. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाच्या वार्षिक स्रेहसंमेलनाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रमेश बगदुरे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बस्वराज वलांडे, प्राचार्य डॉ. प्रदीप पाटील, विद्यार्थी विकास परिषद समन्वयक डॉ.विनोद चिंते, विद्यार्थी सचिव तृप्ती दाडगे, प्रा.डॉ.संध्या शर्मा, सतीश हाणेगावे व विद्यार्थी संसदेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जीवनात नेहमी चांगले मित्र व चांगली संगत बाळगणे आवश्यक असून पाहत असलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यादिशेने सकारात्मक वाटचाल करावी असे सांगून डॉ. पवार म्हणाले की, अधून-मधून भारत महासत्ता होतो, माझ्या बापानं पिकवली माझी शाळा, तु है मेरी किरण पेक्षा आलो तुला शरण इत्यादी कविता सादर करून रसिक श्रोत्यांची मने जिंकली. अध्यक्षीय समारोप रमेश बगदुरे यांनी केला. वार्षिक स्रेहसंमेलनाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या विविध बौद्धिक व क्रीडा स्पर्धा, स्वयंशासन दिन, अनुभव कथन, वेशभूषा, आनंदनगरी, सांस्कृतिक कार्यक्रम-विविध गुणदर्शन, साधे व संगीत शेलापागोटे इत्यादीतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजयकुमार पवार यांनी केले. प्रास्ताविक डॉ. विनोद चिंते यांनी केले. उपस्थितांचे आभार तृप्ती दाडगे यांनी मानले. याप्रसंगी प्रा.अनंत गोदरे, प्रा.महेंद्र गिरी, विद्यासागर पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.