लातूर : प्रतिनिधी
येथील श्री. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थाद्वारा संचलित श्री. देशिकेंद्र विद्यालयाचा दहावीचा निकाल ९९.५८ टक्के लागला असून चार विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण तर १४८ विद्यार्थ्यांनी ९० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवत विद्यालयाची उज्ज्वल निकालातील परंपरा या वर्षीही कायम राखली आहे.
मार्चमध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस या विद्यालयाचे ७१९ विद्यार्थी परीक्षेस सामोरे गेले. त्यापैकी ७१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ४०३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ३०६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ८८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १९ तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा शेकडा निकाल ९९.५८ इतका लागला. विद्यालयाचा हा निकाल विद्यार्थ्याची मेहनत, शिक्षकांचे प्रयत्न, पालकांचे मार्गदर्शन यांच्या समन्वयातून लागला असून संस्थाचालकांची प्रेरणा व मार्गदर्शन ही यासाठी मोलाचा ठरला असल्याचे मुख्याध्यापक आर. टी. सगर यांनी सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. सांबप्पा गिरवलकर, सचिव माधवराव पाटील टाकळीकर, सर्व पदाधिकारी व संचालक, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. टी.सगर, पर्यवेक्षक आऊबाई गिरी, महादेवी पाटील, बसलिंग भुजबळ, दयानंद रामपूरे, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.