लातूर : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने १८ वर्षावरील ८ लाख ५२ हजार ७४२ पात्र लाभार्थी यांना बुस्टर डोस देण्यासाठी ‘कोविड व्हॅक्सीन अमृत महोत्सव’ हा दि. १५ जुलै ते ३० सप्टेंबर ७५ दिवसांच्या कालावधीत सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्रा. आ. केंद्र, उपकेंद्र व आवश्यकतेनुसार शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय याठिकाणी राबविले जाणार आहे.
लातूर जिल्ह्यात यापुर्वी फक्त ६० वर्षावरील नागरिकांना मोफत बुस्टर डोस दिला जात आहे. पण १८ ते ६० वर्षातील लाभार्थीना ही सुविधा मोफत नव्हती. ‘कोविड व्हॅक्सीन अमृत महोत्सव’ च्या निमित्ताने १८ वर्षावरील सर्व पात्र नागरिकांना ३० सप्टेंबर पर्यंत मोफत दिली जाणार आहे. यात ज्यांचा दुसरा डोस घेऊन ६ महिने (२६ आठवडे) झाले आहेत. त्यांनी जवळच्या शासकीय दवाखान्यात संपर्क साधुन बुस्टर डोस घ्यावा. लसीकरणास जाताना लाभार्थ्यांनी यापुर्वी कोविड लसीचा डोस घेताना वापरलेले ओळखपत्र सोबत घेऊन जावे लागणार आहे.
१८ वर्षातील १६ लाख ४४ हजार ३२ नागरिकांनी पहिला लसीचा डोस घेतला आहे. तर १३ लाख ८० हजार ९३१ नागरीकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. दुस-या लसीकरणानंतर बुस्टर डोससाठी पूर्वी ९ महिन्याचा कालावधी दिला आहे. सदर कलावधी ६ महिन्याचा करण्यात आला आहे. त्यामुळे बुस्टर डोससाठी ८ लाख ५२ हजार ७४२ लाभार्थी पात्र आहेत.