लातूर : हिप्परगा (ता. औसा) येथे श्री संत सावता माळी मंदिराची उभारणी करण्यात आली असून, या मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त दि. २२ ते २८ फेब्रुवारीदरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ््यादरम्यान दि. २२ फेब्रुवारी रोजी माजी मंत्री बसवराज पाटील, माजी आमदार दिनकर माने, माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, माजी नगरसेवक शरद पेठकर यांच्या उपस्थितीत महापूजा आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
ग्रामस्थ आणि दानशूरांनी दिलेल्या देणगीतून हिप्परगा (ता. औसा) येथे श्री संत सावता माळी मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह होणार असून, यानिमित्त रोज प्रवचन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यासोबतच हरिजागरही होणार असून, यासाठी विविध गावांतील भजनी मंडळांचा सहभाग असणार आहे.
त्यानंतर दि. २८ फेब्रुवारी रोजी श्री श्री महंत राजेंद्र गिरी महाराज (मठ श्रीनाथ महाराज देवस्थान, देवताळा) यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संत सावता माळी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.