लातूर : प्रतिनिधी
आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेश मिळावा यासाठी जिल्ह्यातील २१९ शाळेतील १ हजार ७३५ जागेसाठी पालकांनी ५ हजार २१ पाल्यांचे ऑनलाईन अर्ज भरले होते. राज्यस्तरावरून मोफत प्रवेशाची सोडत निघाली असून जिल्ह्यातील १ हजार ६६२ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाची लॉटरी लागली आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अपंग प्रवर्गातील लाभार्थ्यांना तसेच इतर संवर्गातील ज्या पालकांचे वार्षिंक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे, अशा पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के (आरटीई) मोफत प्रवेशसाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज प्रक्रीया शनिवार दि. १९ फेबु्रवारी पासून सुरू झाली होती. लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे नोंदणी झालेल्या २१९ शाळेतील २५ टक्के जागेच्या मोफत प्रवेशासाठी ५ हजार ६१ अर्ज ऑनलाईन आले होते. या अर्जांची छानणी केली असता ४० पालकांनी डबल अर्ज भरल्याचे समोर आल्याने ते अर्ज बाद करण्यात आले. त्यामुळे मोफत प्रवेशाच्या लॉटरीसाठी ५ हजार २१ पालकांचे अर्ज वैध ठरले.
राज्य स्तरावरून निघालेल्या मोफत प्रवेशाच्या लॉटरी मध्ये लातूर जिल्ह्यातील १ हजार ६६२ पालकांच्या पालल्यांना मोफत प्रवेशाची लॉटरी लागली आहे. या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश शुक्रवार दि. २० एप्रिल पर्यंत घ्यावा लागणार आहे. यात लातूर जिल्ह्यातील २१९ शाळा आरटीई मोफत प्रवेशासाठी पात्र ठरल्या आहेत. यात अहमदपूर तालुक्यातील १६ शाळेतील १२० जागेसाठी ११८ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाची लॉटरी लागली आहे. औसा तालुक्यातील १८ शाळेतील १०३ जागेसाठी ९६ जणांना लॉटरी, चाकूर तालुक्यातील १३ शाळेतील ८० जागेसाठी ६६ जणांना लॉटरी, देवणी तालुक्यातील ८ शाळेतील ४७ जागेसाठी ४५ जणांना लॉटरी, जळकोट तालुक्यातील ४ शाळेतील १० जागेसाठी १० जणांना लॉटरी, लातूर तालुक्यातील ९६ शाळेतील ९०३ जागेसाठी ८९१ जणांना लॉटरी, निलंगा तालुक्यातील २६ शाळेतील २०८ जागेसाठी १७७ जणांना लॉटरी, रेणापूर तालुक्यातील ८ शाळेतील ३२ जागेसाठी ३१ जणांना लॉटरी, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील २ शाळेतील १२ जागेसाठी १२ जणांना लॉटरी, तर उदगीर तालुक्यातील २८ शाळेतील २२० जागेसाठी २१६ जणांना मोफत प्रवेशाची लॉटरी लागली आहे.