17.6 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeलातूर५ डिसेंबरपर्यंत लस घ्या, कारवाई टाळा

५ डिसेंबरपर्यंत लस घ्या, कारवाई टाळा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
ओमिक्रॉन या कोरोना विषाणुचा नवीन प्रकार समोर आल्याने जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान ओमिक्रॉन विषाणुची लागण लातूर जिल्ह्याला होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने काही नवे निर्देश दिले आहेत. दि. ५ डिसेंबर २०२१ पर्यंत ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असले त्यांनी दुसरा डोस घ्यावा, ज्यांनी पहिलाही डोस घेतला नसेल त्यांनी पहिला डोस घ्यावा अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रभारी जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी सोमवारी सायंकाळी फेसबुक लाईव्हमध्ये लातूर जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधताना दिला आहे.

ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन विषाणुच्या रुपाने कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवल्याने राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्ह्यांना दिल्या आहेत. त्याचाच एका भाग म्हणून सोमवारी सायंकाळी प्रभारी जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधून या अनुषंगाने काही नवे निर्देश दिले आहेत. या फेसबुक संवादात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख सहभागी झाले होत.े

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि. २८ नोव्हेंबर रोजी व्हीसी घेतली. ओमिक्रॉनमुळे चिंता निर्माण झाली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यानूसार जिल्हा प्रशासनाने काही निर्णय घेतले आहेत, असे नमुद करुन प्रभारी जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे म्हणाले, तिकीट लावून असलेले किंवा विनातिकीट कार्यक्रम आयोजित करणा-या संयोजकांनी, कार्यक्रमात सहभाग सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे, जिल्ह्यातील सर्व ठोक, किरकोळ भूसार दुकाने, इतर प्रकारची दुकाने, रेस्टॉरंट, ढाबे, खानावळी, हॉटेल्स, मॉल्स, पेट्रोलपंप चालक, मालक, कर्मचा-यांनी लसीकरण करुन घ्यावे. ज्यांनी पहिला डोस घेतला त्यांनी दुसरा व ज्यांनी लसच घेतली नाही त्यांनी निदान पहिला डोस दि. ५ डिसेंबरपर्यंत घेणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील ऑटोरिक्षा, खाजगी ट्रॅव्हल्स, रेल्वे, एसटी, टॅक्सी याशी संबंधीत यंत्रणेने किमान एक तरी डोस घेतलेला असणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर तिकीट बुक करताना संबंधीत प्रवाशाने लस घेतलेली असल्यासच त्याचे तिकीट बुक करावे. चित्रपटगृह, नाट्यगृह, सभागृह, मंगल कार्यालयावरही राज्य शासनाने ५० टक्के क्षमतेचे नियम घातले आहेत. एक हजारापेक्षा जास्त लोक एकत्र येणा-या कार्यक्रमाची पुर्वकल्पना संबंधीत तालुक्याच्या तहसीलदार यांना देणे आवश्यक आहे. संबंधी विभागाचे प्रतिनिधी कार्यक्रमस्थळी भेट देऊन पाहणी करुन परवानगी दिल्यासच कार्यक्रम घेता येणार आहे. सर्वांनी लस घेणे आवश्यक आहे.त्याशिवाय मास्कचा वापर, दोघांमध्ये सहा फुटांचे अंतर, सॅनिटायझरचा वापर, गर्दी टाळणे, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, अशा सूचना यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केल्या.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या