लातूर : प्रतिनिधी
शासनाने इयत्ता १ ली ते १२ पर्यंतचे ऑफलाईन वर्ग वाढत्या कोरोनामुळे बंद करून ते ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यात बदल करत शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील व शहरी भागातील इयत्ता ५ वी व १२ वी चे वर्ग सोमवार दि. २४ जानेवारी पासून कोरोनाचे नियम पाळून ऑफलाईन
सुृरू करण्याच्या सुचना शाळा, महाविद्यालयांना दिल्या आहेत.
कोरोना ओमिक्रॉन विषाणूच्या व बाधितांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर दि. १० जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा बंद राहतील, अशा सुचना शासन स्तरावरून देण्यात आल्या होत्या. त्यांनतर ऑनलाईन वर्ग सुरू झाले होते. कोव्हिड-१९ च्या प्रसाराचे कमी होणारे प्रमाण लक्षात घेता यापुर्वी जारी करण्यात आलेल्या कोव्हीड-१९ बाबत महाराष्ट्र शासनाच्या दि. २० जानेवारी रोजीच्या परिपत्रकान्वये सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळा दि. २४ जानेवारी पासुन प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व मनपा आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे इयत्ता ५ वी व १२ वी चे वर्ग सोमवार दि. २४ जानेवारी पासून प्रत्यक्ष अध्ययन व अध्यापनासाठी सुरु होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शाळेत पाठविण्याबाबतचे संमतीपत्र प्राप्त करुन घेण्यात यावे.
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाकडून संमतीपत्र प्राप्त झाले नाहीत. त्या विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन अध्यापनाचे कार्य सुरु ठेवावे. तसेच आजारी विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी परवाणगी असणार नाही. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अध्ययन व अध्यापनासाठी शाळेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित रहावे. शाळा सुरु करण्याच्या पूर्व तयारीकरिता संबंधित शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांना कोव्हीडच्या नियमांचे पालन करुन आवश्यकतेनुसार शाळेत प्रत्यक्ष उपस्थित ठेवणे बाबतची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करावी.
शाळा निर्जंतुकीकरण करने, कोव्हीड सेंटर, विलगीकरण कक्ष व लसीकरण केंद्र अन्य ठिकाणी स्थलांतरित करुन घ्यावे. शाळेतील विद्यार्थ्यांचे नियोजनानुसार लसीकरण करुन घेण्याची जबाबदारी सर्व मुख्याध्यापकांची राहील. शाळेतील सर्व शिक्षकांची कोविड १९ संदर्भात लसीकरणाचे दोन डोस घेणे आवश्यक आहे. तसेच एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी. विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कद्वारे पुर्णत: झाकलेले असले पाहिजे. तसेच सुरक्षीत अंतराचे पालन करणे बंधनकारक राहील. शाळेत परिपाठ, स्रेहसंम्मेलन व गर्दी होऊ शकणारे इतर सर्व कार्यक्रमावर कडक निर्बंध असतील. आरोग्य विभागामार्फत कोविड-१९ संदर्भातील हॉटस्पॉट गावामध्ये पुढील सुचनेपर्यंत शाळा सुरु करु नयेत. सदरील माहितीसाठी तालुका आरोग्य अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या सूचनांचे पालन करावे.