शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या घरपट्टी,पाणीपट्टी,दिवा पट्टी कर वसुली मोहिमेतून चांगली वसूली झाली आहे. या वसूली रकमेतून ग्रामपंचायती गावातील ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देणार आहेत.अनेक वर्षापासून थकलेला कर ग्रामपंचायतीने वसूल केल्याने ग्रामपंचायतीला आर्थिक बळ मिळाले आहे.
िजल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून व गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना घरपट्टी, पाणीपट्टी, दिवा पट्टी कर भरावा यांसाठी प्रत्येक महिन्याच्या २४ तारखेला विशेष कर वसुली दिन साजरा करण्यात आला. या संकल्पनेस तालुक्यातील ग्रामपंचायतीकडून चांगला प्रतिसाद मिळाला.त्यातून कर भरणा चांगला झाल्याने ग्रामपंचायती आर्थिक सक्षम झाल्या आहेत.
दरम्यान ज्या ग्रामपंचायती अंतर्गंत वसूली कमी होती. त्या ठिकाणी गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण व विस्तार अधिकारी दिनकर व्होट्टे यांनी स्वत: ग्रामस्थांना भेट देऊन वसूलीसाठी गती देण्याचे काम केले. परिणामी ज्या गावांत कर भरणा नव्हता,त्या ठिकाणी गटविकास अधिकारी यांनी गावांत फिरणे एवढे प्रभावी ठरले की १६ ते ३० मार्च च्या वसुली पंधरवाड्यात सुमारे १ कोटी ७२ लाख ९१ हजार ७२६ रुपये वसूल झाले. हा वसूल झालेला पैसा ग्रामपंचायतीच्या हक्काचा असून त्या पैशातून ग्रामपंचायती पाणीपुरवठा, विज बिल हातपंप दुरुस्ती,दिवाबत्ती स्वच्छतेसह या रकमेतून अत्यावश्यक सेवा सुविधा पुरवू शकणार आहेत.त्यामुळे हा वसूली दिन व वसूली पंधरवाडा ग्रामपंचायतीसाठी मैलाचा दगड ठरला आहे.
हा ग्रामस्थांचा पैसा ग्रामस्थांना सुविधा देण्यासाठी खर्च करण्यात येत असल्याने ग्रामपंचायतींनाही एक प्रकारे आर्थिक बळ मिळत असून त्यातून ग्रामपंचायती आर्थिक सक्षम होत असत्याने यापुढे ही प्रत्येक महिन्याच्या २४ तारखेला विशेष कर वसुली दिन मोहीम सुरूच राहील, असे गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण यांनी सांगितले.