जळकोट : ओमकार सोनटक्के
काही जण रोजगार शोधण्यासाठी मुंबई पुणे हैदराबाद तसेच अन्य मोठी शहरे गाठतात परंतु एखाद्या व्यक्तीजवळ काहीतरी युक्ती असेल तर त्या रोजगारासाठी कुठेही भटकंती करण्याची गरज भासत नाही. असेच उंद्री (ता. मुखेड) येथील संभाजी गंगाराम लवटे यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी एका ऑटो मध्ये गत अनेक वर्षापासून रसवंतीगृह सुरू केले आहे. या व्यवसायातून दररोज किमान दोन हजार रुपयांपर्यंत मिळत आहेत.
लवटे हे रसवंतीचा ऑटो परिसरातील ५० ते ८० किलोमीटर फिरवतात त्यामुळे त्यांनी या चालत्या बोलत्या रसवंतीगृहातून आपला रोजगार शोधला आहे. दरवर्षी या चालत्या फिरत्या रसवंती गृहाला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये हा व्यवसाय दोन वर्ष बंद होता. त्यानंतर मात्र पुन्हा यावर्षी त्यांनी हा व्यवसाय नव्या जोमाने सुरू केला आहे. यातून त्यांना दिवसाकाठी सर्व खर्च वजा जाता दोन हजार रुपयांची कमाई होत आहे.
रोजगार मिळावा यासाठी युवक हे विविध रोजगार करीत असतात विशेष ज्या ठिकाणी ऊस आहे त्या ठिकाणी रसवंतीगृह हमखास असते विशेषत: राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग , मोठी गावे, बसस्थानक, हॉटेल अशा ठिकाणी रसवंतीगृह असतात यामुळे जे व्यक्ती दुस-या गावी जात आहेत, अशा व्यक्तींनाच रस पिण्याची संधी मिळते परंतु ज्या भागात ऊस नाही अथवा रसवंतीगृह नाही अशांना मात्र उसाचा रस पिणे दुर्मिळ होते. बाहेरगावाहून रस आणणेही शक्य नसते कारण उसाचा रस काही वेळच चांगला राहत असतो. यामुळे आपल्या दारापुढे उसाचा रस येईल का याची वाट नागरिक पाहत असतात.
आता नागरिकांना उसाच्या रसासाठी बाहेरगावी जाण्याची गरज नाही , चक्क घराच्या समोर उसाचा रस देण्याची सोय संभाजी गंगाराम लवटे यांनी करून दिली आहे. त्यांनी एक ऑटो घेतला होता, यात त्यांनी क्रेशर बसवले आहे तसेच या याच ऑटोमधील पाठीमागच्या बाजूस एक डिझेल इंजन बसवली आहे. याच क्रेशर जवळ ऊस ठेवण्याची देखील त्यांनी व्यवस्था केली आहे. तीन वर्षांपूर्वी संभाजी लवटे यांना हे सर्व साहित्य जोडण्यासाठी अडीच लाख रुपयांचा खर्च आला आहे. एखाद्या गल्लीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी उसाच्या रसाची मागणी आली तर लगेच ऊस क्रेशरमध्ये टाकून ताजा रस नागरिकांना ते उपलब्ध करून देत आहेत . सोबत ंिलंबाचा पण ते वापर करीत असतात यामुळे प्रत्येकांना ताजा उसाचा रस पिणे आता शक्य झाले आहे.