लातूर : आर्थिक अडचणीत असलेल्या लातूर महानगरपालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे प्रयत्न महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्र महानरगपालिका अधिनियम १९४९ चे कलम ९५ प्रमाणे तयार केलेले सन २०२०-२१ चे सुधारीत व साल सन २०२१-२२ चे मुळ अंदाजपत्रक दि. ८ मार्च रोजी स्थायी समितीसमोर सादर केले. सदर अंदाजपत्रक १ कोटी २१ लाख रुपये शिलकीचे असून स्थायी समिती येत्या चार दिवसांत त्यावर अभ्यास करुन त्यास मंजूरी देऊन सर्वसाधारण सभेकडे पाठवणार आहे.
स्थायी समितीचे सभापती अॅड. दीपक मठपती यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभागृहात सोमवारी बैठक झाली. या बैठकीस स्थायी समिती सदस्य अशोक गोविंदपुरकर, रविशंकर जाधव, अहेमदखॉ पठाण, व्यंकट वाघमारे, दिप्ती खंडागळे, वर्षा मस्के, जानव्ही सूर्यवंशी, श्वेता लोंढे, स्वाती घोरपडे, वर्षा कुलकर्णी, कमल सोमवंशी, आयुक्त अमन मित्तल, उपायुक्त शशिमोहन नंदा, सहाय्यक आयुक्त सुंदर बोंदर यांची उपस्थिती होती. आर्थिकदृ्ष्ट्या महानगरपालिकेला स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने आयुक्त अमन मित्तल यांनी पावले उचलली आहेत. त्यादृष्टीने त्यांनी प्रशासनाला कामाला लावले आहे. सन २०२०-२१ चे सुधारीत व सन २०२१-२२ चे मुळे १ कोेटी २१ लाख रुपयेश शिलकीचे अंदाजपत्रक आयुक्त मित्तल यांनी स्थायी समितीचे सभापती अॅड. दीपक मठपती यांच्याकडे सादर केले.
या अंदाजपत्रकावर स्थायी समितीचे सदस्य रविशंकर जाधव यांनी गेल्या वर्षी विविध माध्यमातून आलेला किती निधी शिल्लक आहे, याची विचारणा करत तो शिल्लक निधी आगामी वर्षात विकास कामांवर खर्च करता येतो का?, असा प्रश्न उपस्थित केला. याबाबत आयुक्त मित्तल यांनी लेखा परीक्षक डाके यांना विचारणा करुन गतवर्षी किती निणी राज्य शासनाकडे परत गेला याबाबतची माहिती लवकच सादर करण्यात येईल, असे सांगीतले. या अंदाजपत्रकाबाबत स्थायी समिती येत्या चार दिवसांत अभ्यास करुन ते अंदाजपत्रक मंजूर करेल व पुढे सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येईल.