24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरशेतक-यांना प्रति हेक्टरी बागायती क्षेत्रासाठी १ लाख तर कोरडवाहू शेतीसाठी ५० हजारांच्या...

शेतक-यांना प्रति हेक्टरी बागायती क्षेत्रासाठी १ लाख तर कोरडवाहू शेतीसाठी ५० हजारांच्या मदतीची मागणी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जवळपास एक महिन्यापासून ढगाळ वातावरण आणि संततधार पाऊस यामुळे सूर्यदर्शन झालेले नाही. यामुळे खरीप हंगामात शेतक-यांनी केलेली पूर्ण पेरणी वाया गेली आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २७ जुलै रोजी सकाळी लातूर तालुक्यातील खाडगाव येथील रावसाहेब साळुंके यांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. शेतक-यांच्या शेतावर भेट देऊन खाडगाव येथे पाहणी केली. सर्व शेतक-यांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा आणि प्रयत्न करणार असल्याचे सांगून त्यांना धीर दिला. तसेच प्रति हेक्टरी बागायतीसाठी १ लाख तर कोरडवाहू शेतीसाठी ५० हजार रुपये मदतीची मागणी काँग्रेस पक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगीतले.

लातूर जिल्ह्यात सतत पडणारा पाऊस, तसेच शिरुर अनंतपाळसह काही ठिकाणी ढगफुटी होऊन मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिके बाधीत झाली आहेत. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर संबंधित अधिका-यांना नुकसान झालेल्या सर्व ठिकाणच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन शासनाकडे मदत देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, गोगलगायच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्याचाही पंचनामा करण्याच्या कामाला गती द्यावी, पीक विमा भरला असेल त्यांना व ज्यांनी नाही भरला त्यांनाही नुकसान भरपाई द्यावी. शेतक-यांचे झालेले नुकसान मोठे आहे. याकरीता शेतक-यांना प्रति हेक्टरी बागायती क्षेत्रासाठी १ लाख रुपये तर कोरडवाहू शेतीसाठी ५० हजार रुपयाची मदत देण्यात यावी, अशी शासनाकडे काँग्रेसची मागणी आहे, असे सांगितले. राज्य शासनाने ही मदत तात्काळ करावी, अशी आग्रही मागणीदेखील माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे. या प्रसंगी उपस्थित शेतक-यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने सरकारकडे आपण पाठपुरावा करु अशी ग्वाही दिली.

यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय देशमुख, अ‍ॅड. समद पटेल, लातूर उपविभागीय अधिकारी सुनील यादव, लातूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, लातूर तहसीलदार स्वप्निल पवार, लातूर तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, खाडगावचे सरपंच रमाकांत मगर, उपसरपंच योगेश पाटील, तलाठी तावशीकर, ग्रामसेवक लिंबराज गोमसाळे, बालाप्रसाद बिदादा, सुधीर गोजमगुंडे, शरद देशमुख, चंद्रकांत देशमुख, उमेश देशमुख, दौलत देशमुख आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी खाडगाव परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या