लातूर : प्रतिनिधी
सध्या बाजारात १ हजार २७३ मे. टन डीएपी खत उपलब्ध आहे. शेतक-यांनी डीएपीचा आग्रह न करता मिश्र खतांचा वापर करावा. बाजारात मुबलक प्रमाणात मिश्र खते उपलब्ध आहेत. शेतक-यांना लिंकिंगसाठी सक्ती केल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.
जिल्ह्यात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने शेतक-यांनी पेरणीसाठी घाई करु नये. ७४ मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर शेतक-यांनी पेरणीस सुरुवात करावी. यासाठी खते, बियाणे उपब्ध झालेले आहेत. खतासाठी विक्रेत्यांनी शेतक-यांना सक्ती केल्यास तक्रार करावी. संबंधीत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल. शेतक-यांना पेरणीसाठी खत कमी पडणार नाही, यासाठी पाठपुरावा सुरु आहे. सोयाबीन बियाणे खरेदी करताना प्रमाणित कंपनीची बियाणे घ्यावीत. आतापर्यंत युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी, एनपीके मिळून ४० हजार मे. टन खतांची विक्री झाली आहे. पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँका उदासीन असल्याचे दिसून आले आहे. यावर्षी सक्तीने सूचना दिल्या आहेत. तरीही शेतक-यांची गैरसोय
करणा-या बँकाच्या मॅनेजरची हजेरी घेणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने म्हणाले, खत, बियाणे बाजारात उपलब्ध आहेत. अधिकांश शेतकरी डीएपी खताची मागणी करतात. त्यामुळे अनेकदा अडचण होते. डीएपीला पर्यायी खते आहेत. त्याचा वापर करणे गरजेचे आहे. दोन वर्षांपुर्वी सोयाबीन बियाणे न उगवलेल्या जवळपास अडीच हजार शेतक-यांना कंपनीकडून भरपाई मिळवून दिली. शिवाय कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगीतले. प्रा. अरुण गुट्टे म्हणाले, एकाच पीक पद्धतीमुळे जैवविविधतेवर परिणाम होत आहे. सूर्यफुल, मुग, उडीद, राजमा या पिकांचे क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न आहे. उन्हाळ्यात शेतकरी सोयाबीन घेतात पण ते परवडणारे नसल्याचेही त्यांनी सांगीतले.