अहमदपूर :येथील पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानच्या नविन इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून या कामासाठी तब्बल १२ कोटी ५७ लाख ८८ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिली. तसेच या मंजुरीबद्दल त्यांनी राज्य शासनाचे आणि ग्रामविकास मंत्री हसनजी मुश्रीफ यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
अहमदपूर येथील पंचायत समितीमध्ये सध्या ५० ते ५५ कर्मचारी कार्यरत आहेत. या शहरातील जिल्हा परिषद बांधकाम कार्यालयाच्या बाजूला सभापती निवासस्थान व वर्ग-३ आणि वर्ग- ४ या कर्मचा-यासाठी जवळपास अठरा निवासस्थाने बांधण्यात आलेली होती. ही जवळपास सन १९६५ च्या दरम्यान बांधण्यात आली होती. ती सर्व मोडकळीस आणि खराब झालेली आहेत. या ठिकाणी गटविकास अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र निवासस्थानाची व्यवस्था नव्हती. येथे नवीन मान्यतेनुसार गटविकास अधिकारी, सभापती ,कक्ष अधिकारी ,विस्ताराधिकारी वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचा-यासाठी येथे राहण्याची चांगली सुविधा होणार आहे. येथे पंचायत समितीची खूप जागा उपलब्ध आहे. या निवासस्थानाचा लाभ गरजू कर्मचा-याांंना निश्चीतच घेता येणार आहे. या नवीन निवास्थान इमारतीचे काम सुरू केल्यापासून ते दोन वर्षाच्या आत पूर्ण करण्यात येणार आहे.
पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकामाचा प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावानुसार एकूण १८०४.७४ चौ.मी. इतक्या क्षेत्रफळाची एकूण २६ निवासस्थाने बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या सर्व बांधकामासाठी १२ कोटी ५७ लाख ८८ हजार रुपये खर्च येणार आहेत. लवकरच हे काम हाती घेण्यात येणार असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.