लातूर : नेपाळ येथील काठमांडू शहरात दि. २६ ते २८ मे दरम्यान झालेल्या पहिल्या साऊथ एशियन लाठी स्पर्धेत दयानंद कला महाविद्यालयाच्या अजिंक्य बिराजदार या अकरावी वर्गात शिकणा-या विद्यार्थ्याने सुवर्ण पदक पटकावले. अजिंक्य बाळासाहेब बिराजदार एकम लाठी स्पर्धेत १ सुवर्ण पदक पटकावून नेत्रदिपक कामगीरी केली.
या स्पर्धेत नेपाळ, भारत, बांग्लादेश, श्रीलंका व पाकिस्तान इत्यादी पाच देशाचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय एशियन लाठी स्पर्धेसाठी दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने प्रवासासाठी २५ हजार रुपये आर्थिक सा संस्थेच्या वतीने देण्यात आले. संस्थेकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळेच आज त्याने हे यश संपादन केले आहे. याबरोबरच अजिंक्यने कराटे स्पर्धेत रौप्यपदक व कांस्य पदक प्राप्त केले आहे. त्याने या स्पर्धेत दयानंद शिक्षण संस्थेबरोबरच भारत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तसेच वीरशैव संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रांगोळी व चित्रकला स्पर्धेत आदित्य नंदकुमार कुलकर्णी या दयानंद कला महाविद्यालयाच्या अकरावी वर्गात शिकणा-या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.
या दोघांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रंसगी सचिव रमेश बियाणी, अॅड. स्रेहल उटगे, प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, प्राचार्या डॉ. पुनम नाथानी, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ. संदीपान जगदाळे, डॉ. गोपाल बाहेती, प्रा.दिनेश जोशी, प्रा. विलास कोमटवाड, प्रा. सुरेश क्षीरसागर, प्रा. महेश जंगापल्ले आदी उपस्थित होते.