लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभागीय मंडळाच्यावतीने लातूर, नांदेड व उस्मानाबाद जिल्हयातील २२४ परीक्षा केंद्रावर ९१ हजार ६४१ विद्यार्थी मंगळवार दि. २१ फेबु्रवारी पासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा देणार आहेत. शिक्षण मंडळाच्यावतीने तयारी पूर्ण झाली असून परीक्षेतील गैर प्रकार रोखण्यासाठी भरारी व बैठे पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभागीय मंडळाने लातूर जिल्हयातील ९२ केंद्रावर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेसाठी ३५ हजार ५१० विद्यार्थी बसले आहेत. नांदेड जिल्हयातील ९२ केंद्रावर ३९ हजार ७७२ विद्यार्थी परिक्षेला बसणार आहेत. तर उस्मानाबाद जिल्हयातील ४० केंद्रावर १६ हजार ३६९ विद्यार्थी परिक्षेला बसणार आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याची परिक्षा म्हणून या परिक्षेकडे पाहिले जाते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी व मार्च मध्ये घेण्यात येणा-या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे प्रभावी संचलन व गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्र प्रमुखांच्या व कस्टोडियनच्या ऑनलाईन व ऑफलाईन पथकांच्या बैठका नियोजीत केल्या आहेत.
सिसिटीव्हीचीही नजर राहणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने लातूर, उस्मानाबाद व नांदेड जिल्हयातील ७२३ महाविद्यालयातील इयत्ता १२ वीच्या ९१ हजार ६४१ विद्यार्थ्यांची परिक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. ज्या महाविद्यालयात सिसिटिव्ही आहे. अशा ठिकाणी परिक्षेसाठी त्याचा वापर केला जाणार आहे. सदर परिक्षा सकाळ व दुपार अशा दोन सत्रात पार पडणार आहे.